‘सीईटी’साठी ‘ड्रेसकोड’ नाही!

‘सीईटी’साठी ‘ड्रेसकोड’ नाही!

काही नियम शिथिल; परीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश नाही

पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काल ‘नीट’ झाली. आता ११ मे रोजी अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्याची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ‘नीट’साठी जेवढी कठोर बंधने घातली होती, ती ‘सीईटी’साठी नाहीत. ‘ड्रेसकोड’ आणि परीक्षेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर प्रवेशबंदी हा नियमदेखील ‘सीईटीसाठी’ नाही; मात्र परीक्षा सुरू झाल्यावर कोणत्याही स्थितीत प्रवेश मिळणार नाही.

लवकर पोचा 
राज्याच्या सीईटीसाठी तीन लाख ९८ हजार विद्यार्थी बसणार आहेत. पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी ४४ हजार विद्यार्थी ९९ उपकेंद्रांवर परीक्षा देतील. राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत येत्या गुरुवारी होणाऱ्या परीक्षेसाठी तीन पेपर असतील. त्यांच्या वेळा निश्‍चित आहेत. वेळेच्या किमान ४५ मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात सोडले जाणार आहे. परीक्षा केंद्र आणि घर यांतील अंतर लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी प्रवासाचे नियोजन केले पाहिजे.  

केंद्र चुकू नये म्हणून...
अनेकदा परीक्षा केंद्र कुठे आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना नसते. त्यामुळे परीक्षेला निघण्यापूर्वी केंद्राचा पत्ता शोधला, तर चुकीच्या केंद्रावर पोचण्याची शक्‍यता असते. त्यामुळे शक्‍यतो परीक्षेच्या आधी एक दिवस आपल्याला केंद्र म्हणून कोणती शाळा मिळाली आहे, याचा शोध विद्यार्थी वा पालकांनी घ्यावा. म्हणजे ऐनवेळी केंद्र चुकले म्हणून प्रवेश परीक्षेपासून वंचित राहावे लागणार नाही.   

ओळखपत्र जवळ हवेच
एखाद्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ऐनवेळी गहाळ झाले, तर गोंधळून जाऊ नका. सोबत आधार कार्ड किंवा स्वतःचे छायाचित्र असलेले कोणताही एक सरकारी कागदपत्र जवळ ठेवा. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रावरील उमेदवारांच्या छायाचित्रांची खात्री पटविण्यासाठी उमेदवारांनी सोबत आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र, फोटोसहित असलेले बॅंक पासबुक सोबत आणावे. सरकारी यंत्रणेकडे प्रत्येक विद्यार्थ्याचा फोटो असलेले उपस्थितीपत्र असते. विद्यार्थ्याकडील छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची या उपस्थितीपत्राशी पडताळणी करून विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. 

तर प्रवेश नाही
प्रत्येक पेपरचा परीक्षा कालावधी दीड तासाचा आहे. गणित (पेपर-१), भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र (पेपर-२) आणि जीवशास्त्र (पेपर-३) या विषयांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा सुरू झाल्यावर कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेसाठी आवश्‍यक प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमधून परीक्षेच्या तारखेपर्यंत म्हणजेच ११ मेपर्यंत डाउनलोड करून घेता येतील.  

काय आणावे, काय नको
विद्यार्थ्यांना काळ्या शाईचे बॉलपेन, पाण्याची बाटली, बिस्कीट पुडा व रायटिंग पॅड याच वस्तू आणण्यास परवानगी आहे. पुस्तके, घड्याळ, मोबाईल, कॅलक्‍युलेटर, लॉग टेबल, पिशवी असे अन्य कोणतेही साहित्य नेण्यास बंदी आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र याशिवाय कोणताही कागद विद्यार्थ्यांनी जवळ ठेवू नये.

नीट परीक्षेसाठी घातलेली कठोर बंधने सीईटीसाठी घातलेली नाहीत; मात्र परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहणे आवश्‍यक आहे. परीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश दिला जाणार नाही, याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. ‘सीईटी’साठी कोणताही ‘ड्रेसकोड’ नाही.
- डॉ. दिलीप नंदनवार (सहसंचालक, तंत्र शिक्षण संचालनालय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com