आता पोलिस पडताळणीपूर्वीच मिळणार पासपोर्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

पुणे - ‘तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र असेल, तर आता पोलिस पडताळणी प्रक्रियेपूर्वीच (व्हेरिफिकेशन) तुम्हाला "पासपोर्ट‘ मिळणे शक्‍य होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट हातात आल्यानंतर कालांतराने पोलिस पडताळणी करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे, त्यामुळे आता पोलिस पडताळणीपूर्वीच नागरिकांच्या हाती पासपोर्ट पडणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आता नागरिकांना अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत पासपोर्ट मिळणे शक्‍य होणार आहे. यापूर्वी "तत्काळ‘मध्ये अर्ज केलेल्या नागरिकांनाच फक्त पोलिस पडताळणीपूर्वी पासपोर्ट हाती मिळत होता. परंतु आता नियमितपणे अर्ज करणाऱ्या नागरिकांनादेखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या पुढील काळात नव्याने पासपोर्ट काढणाऱ्या अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र ही आवश्‍यक कागदपत्रे असतील, तर त्याला पंधरा दिवसांच्या आत घरपोच पासपोर्ट मिळणार आहे. पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सोईस्कर व्हावी, यासाठी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नियमित पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी, त्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन होत होते आणि त्यानंतर पासपोर्टची छपाई केली जात असे. मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला, शैक्षणिक पुरावा या प्राथमिक कागदपत्रांबरोबरच आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड या तीन कार्डांवर समान माहिती असणे आवश्‍यक आहे. तसेच अर्जदाराकडून विशिष्ट अर्ज भरून घेतला जाईल, त्याशिवाय आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाईल, अशी माहिती पुणे विभागाचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविली आहे.