एनसीसी छात्रांची संख्या वाढणार

संतोष शाळिग्राम
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - शाळकरी वयात लष्कराची ओळख करून देणारी आणि पुढे लष्करात जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे युनिट सुरू करण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. येत्या दोन वर्षांच्या काळात या सेनेतील छात्रांची संख्या १३ लाखांवरून पंधरा लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने विद्यार्थिनींची संख्या वाढविण्याचा उद्देश आहे.

पुणे - शाळकरी वयात लष्कराची ओळख करून देणारी आणि पुढे लष्करात जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे युनिट सुरू करण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. येत्या दोन वर्षांच्या काळात या सेनेतील छात्रांची संख्या १३ लाखांवरून पंधरा लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने विद्यार्थिनींची संख्या वाढविण्याचा उद्देश आहे.

सध्या कोणत्याही शाळेत वा महाविद्यालयात एनसीसीचे युनिट सुरू करायचे असेल, तर प्रशिक्षण देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे ते शक्‍य होत नाही. त्यामुळे युनिट सुरू करण्यासाठी वाट पाहावी लागते. साडेसहा हजार शाळा, महाविद्यालयांची प्रतीक्षा यादी राष्ट्रीय छात्र सेनेकडे आहे. हा मुद्दा संरक्षणविषयक स्थायी समितीच्या बैठकीत चर्चिला गेला. या समितीने संख्या वाढविण्याची शिफारस संरक्षण विभागाला केली आहे.

केंद्र सरकारनेही २०२०पर्यंत एनसीसीचा देशभरातील विस्तार पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत छात्रांची संख्या १५ लाखांपर्यंत नेण्यास तयारी दर्शविली आहे. त्यासाठी विस्तारास आवश्‍यक बाबी; तसेच पायाभूत सुविधा, कपड्यांची कमतरता यांचा आढावा घेतला जाईल. तसेच निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना एनसीसीसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्याबाबतही विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनसीसीला २०१७-१८ या वर्षासाठी वेतनेतर खर्चासाठी ४२० कोटी रुपयांची तरतूद होती. त्यातील केवळ २२७ कोटी रुपये त्यांना मिळाले आहेत. यामुळे प्रशिक्षण उपक्रमांवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तरतुदींमधील उर्वरित रक्कम त्यांना दिली पाहिजे, अशी सूचना स्थायी समितीने केली आहे.

पुणे मुख्यालयांतर्गत अकरा हजारांवर छात्र
पुणे ग्रुप मुख्यालयांतर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांत महाविद्यालयांतील एनसीसीमध्ये पाच हजार २९६, तर शाळांमधील एनसीसीमध्ये ६ हजार ६९१ छात्र प्रशिक्षण घेत आहेत.

एनसीसीचा फायदा
एनसीसीचे प्रशिक्षण घेत असताना ‘सी’ प्रमाणपत्राची परीक्षा देऊन त्यात अल्फा ग्रेड मिळाली, तर त्या विद्यार्थी वा विद्यार्थिनीला चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये प्रवेशावेळी लेखी परीक्षेतून सूट दिली जाते, असे एनसीसीच्या पुणे गट मुख्यालयातील सूत्रांनी सांगितले.

अकरावीला एनसीसीमध्ये असताना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी माझी निवड झाली. त्यानंतर सिंगापूर येथे भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळाले. त्या वेळी लष्कर अधिकाऱ्यांची सेवा जवळून पाहता आली. यामुळे लष्करात जाण्याचा निश्‍चय केला होता. 
- किरण राऊत (‘एनसीसी’तून प्रेरणा घेऊन लष्करात लेफ्टनंट पदापर्यंत पोचलेली पुण्यातील विद्यार्थिनी)

एनसीसी युनिट
शाळा :     10,472
महाविद्यालये :     5546
युनिटसाठी प्रतीक्षा यादी
शाळा :     4244 
महाविद्यालये :     2383
सध्याचे छात्र
विद्यार्थी :     12,81,298
विद्यार्थिनी :     3,64,084

Web Title: Number of NCC students will increase