जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य 

bjp
bjp

पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख नेत्यांबरोबर प्रदेश कार्यकारिणीची व शहर पदाधिकाऱ्यांची सलग दोन दिवस बैठक झाली. त्यामध्ये पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांना निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

भाजपने महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससह विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी महापौर आर. एस. कुमार, राजेंद्र काळभोर, बाळा शिंदे, विनायक गायकवाड, सुरेश चौंधे, संतोष बारणे अशी काही नावे घेता येतील. लवकरच आमदार लांडगे यांचे काही समर्थक नगरसेवक पक्षात प्रवेश करतील. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे काही समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ आहेत. इतके वर्ष इमाने-इतबारे पक्षासाठी काम केले आणि आता दुसऱ्याला संधी मिळाली तर आपले काय होणार या भीतीने ते चिंतेत आहेत. काही प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळोवेळी ही चिंता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश संघटक रवींद्र भुसारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. त्याची दखल घेत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती. 

या बैठकीला स्वतः जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, संघातील काही प्रमुख व्यक्ती, पक्षाचे प्रदेश संघटक रवींद्र भुसारी यांच्यासह आणखी काही पदाधिकारी उपस्थित होते. 

इतर पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा पक्षाच्याच जुन्या कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देण्यावर बैठकीत एकमत झाले. या भूमिकेमुळे निवडणूक लढविण्याच्या इराद्याने पक्षात येणाऱ्यांना चाप बसणार आहे. पक्षाच्या सर्व सहाही सरचिटणीसांना निवडणुकीत उतरविण्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच सध्या प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींपैकी उमा खापरे, ऍड. सचिन पटवर्धन यांना निवडणूक लढविण्याविषयी आग्रह करण्यात आला. परंतु, दोघांनीही आता महापालिका स्तरावर लढण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले. माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, प्रदेश सदस्य अमर मूलचंदानी, महेश कुलकर्णी यांना निवडणूक लढविण्यासाठी तयार केले जाणार आहे. नवी प्रभागरचना मूलचंदानी, कुलकर्णी, पवार, कामतेकर, थोरात यांच्यासाठी सोयीची मानली जाते. त्यामुळे पक्षवर्तुळात संभाव्य उमेदवारांमध्ये त्यांची नावे निश्‍चित मानली जातात. पण, सहापैकी काही निवडक सरचिटणीसांमध्येच निवडून येण्याची क्षमता आहे. 

महामंडळ अध्यक्षपदाला प्राधान्य 

या बैठकीमुळे जुन्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला असला, तरी काही पदाधिकारी निवडणूक लढविण्यापेक्षा विविध महामंडळांच्या अध्यक्षपदाकडे डोळे लावून बसल्याने कोण निवडणुकीत उतरणार आणि कोण महामंडळावर जाणार, याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com