ऑनलाइन पद्धतीनेच शेवटपर्यंत प्रवेश

ऑनलाइन पद्धतीनेच शेवटपर्यंत प्रवेश

पुणे - पुणे- मुंबईपाठोपाठ आता नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद येथेदेखील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. तसेच, दुसऱ्या फेरीपासून प्रत्येक फेरीला विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येणार आहेत, यामुळे बेटरमेंटची सवलत रद्द करण्यात आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. शेवटचा विद्यार्थी प्रवेश घेईपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे.  

विद्यार्थ्याला एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला/ वाणिज्य/ विज्ञान या शाखांपैकी एकाच शाखेची मागणी करता येईल. परंतु, विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार प्रवेश अर्जातील भाग दोनमधील शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची मुभा विद्यार्थ्यांना राहील. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीसाठी स्थानानुसार भौगोलिक झोन व वॉर्ड गटात कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता प्रवेश अर्ज भरताना किमान एक आणि कमाल दहा पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे.  

दहावीचा निकाल लागल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे चार नियमित फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. 

चार फेऱ्या १५ जुलैपर्यंत झाल्यानंतर एक सप्टेंबरपर्यंत दोन आठवड्याला एक याप्रमाणे तीन अतिरिक्त फेऱ्या होतील. नियमित चार फेऱ्या झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू करायचे आहेत.

पहिल्या फेरीनंतर पुढील प्रत्येक फेरीला विद्यार्थ्यांना महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा राहील. एखाद्याने पसंतीक्रम बदलला नाही, तर त्याचे आधीचे पसंतीक्रम कायम राहतील.

पहिली पसंती सक्तीची

प्रत्येक फेरीत पहिला पसंतीक्रम दिलेले महाविद्यालय प्रवेशासाठी मिळाले, तर तिथे संपूर्ण शुल्क भरून प्रवेश घेणे विद्यार्थ्याला बंधनकारक आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील फेऱ्यांसाठी बाद ठरतील.

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही; परंतु प्रवेश फेऱ्यांमध्ये मिळालेले महाविद्यालय हवे असल्यास विद्यार्थ्यांना तेथे पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेता येईल. प्रवेश समितीने दिलेल्या मुदतीत प्रवेश घेतला नाही, तर त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलता येईल.

फेऱ्यांमध्ये एक ते दहा पसंतीक्रम देण्याची अट असली, तरी एखाद्या विद्यार्थ्याने एकच पसंतीक्रम दिला, तरी त्याचा पुढील फेऱ्यांसाठी विचार केला जाणार आहे.

प्रत्येक फेरीतील प्रवेश हे विद्यार्थ्यांचा संवर्ग, गुणवत्ता आणि पसंतीक्रमानुसार होणार आहेत. 

पहिली नियमित फेरीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शून्य फेरी घेतली जाईल. त्यात संस्थांतर्गत (इनहाउस), व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, तसेच द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या जागा भरल्या जातील.

कोट्यातील जागा पूर्णपणे भरल्या नाही, तर कनिष्ठ महाविद्यालयांनी शिल्लक जागांपैकी आवश्‍यकतेनुसार जागा ठेवून उर्वरित जागा केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीस ऑनलाइन प्रत्यार्पित (सरेंडर) करायच्या आहेत.

महाविद्यालयांनी ठेवून घेतलेल्या आरक्षित कोट्यातील जागा नियमित फेऱ्या सुरू झाल्यानंतर प्रत्यार्पित करता येणार नाहीत.

एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्याही कोट्यातील प्रवेश पूर्ण शुल्क भरून घेतला असेल, तर त्याचे नाव इतर फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे.

नियमित व अतिरिक्त फेरी संपल्यानंतर म्हणजेच एक सप्टेंबरनंतर प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना रिक्त जागा असल्यास तेथे जाण्याची मुभा देण्यात येईल.

रिक्त जागेवर जाण्याची मुभा विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसेपर्यंत उपलब्ध राहील. म्हणजेच विद्यार्थ्यांना बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय बदलायची संधी असल्यास ती मिळू शकेल.

अर्ज भरण्याची सुविधा देणार 
विद्यार्थ्यांना यंदा केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे किंवा खासगी शिकवणी चालकांकडे किंवा इतर व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज भरू नयेत. पालकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मार्गदर्शन केंद्रांची संख्या वाढवून आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com