ऑनलाइन प्रचाराची ‘धूम’

ऑनलाइन प्रचाराची ‘धूम’

महापालिका निवडणूक; इच्छुकांकडून जय्यत तयारी

पुणे - तुमच्या मोबाईलवर व्हॉट्‌सॲपमध्ये राजकीय नेत्यांचे संदेश, फेसबूक-ट्विटर अकाउंटवर ‘हसरे राजकीय चेहरे’ आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा, ई मेल आयडीवर मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन... महापालिका निवडणुका चार महिन्यांवर असल्या तरी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा नारळ ‘ऑनलाइन’ व सोशल मीडियाच्या माध्यमातून फोडल्याचे दिसते आहे.  

निवडणूक म्हटली की कर्णा लावलेल्या रिक्षातून कर्कश आवाजातला प्रचार, भिंतींवर चिकटवलेली पत्रके, फ्लेक्‍सबाजी असे चित्र नेहमी दिसते. पण, आता ‘सोशल मीडिया’च्या प्रभावामुळे पारंपरिक प्रचार पद्धतीला फाटा देत अधिकाधिक मतदारांपर्यंत व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌विटर, ‘एसएमएस’, ‘व्हाइस रेकॉर्डिंग’ अशा ऑनलाइन व मोबाईल माध्यमाद्वारे पोचण्याचा प्रयत्न प्रस्थापित व इच्छुक उमेदवारांकडून सुरू झाला आहे. 

चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे एवढ्या मतदारांपर्यंत पोचण्याचे इच्छुकांपुढे मोठे आव्हान राहणार आहे. इच्छुक किती लोकप्रिय असले तरी, नव्या रचनेमुळे त्यांची दमछाक होणार आहे. त्यातच, प्रभागांच्या मोडतोडीमुळे प्रस्थापितांसह इच्छुकांमध्ये भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर मतदारांवर अधिक प्रभाव टाकण्यासाठी इच्छुकांकडून ‘हाय टेक’ प्रचाराचा अवलंब केला जात आहे. डिजिटल प्रचारासाठी एक वेगळी ‘टीम’ कार्यान्वित करून प्रभागातील मतदारांचे मोबाईल क्रमांक गोळा करण्याची मोहीम राबविली जात आहे.

विशेषत: सोसायट्यांचे पदाधिकारी आणि प्रमुख रहिवाशांचा मोबाईल क्रमांकांचे संकलन केले गेले आहे. प्रभागातील नागरिकांना ‘एसएमएस’ आणि ‘व्हाइस रेकॉडिंग’च्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचे नियोजन होत आहे. सणासुदीसह कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘एसएमएस’ आणि दसरा, दिवाळीत ‘व्हाइस रेकॉर्डिंग’द्वारे पोचण्याचा इच्छुकांचा प्रयत्न आहे. 
 

सोशल मीडियावरून प्रचार करणे म्हणजे फक्त फोटो आणि एखादे वाक्‍य टाकणे एवढे सोपे काम नसते. उमेदवाराची माहिती, फोटो, घोषणा, उपक्रमांबाबत विचारपूर्वक डिझाईन करून त्या पोस्ट टाकाव्या लागतात. व्हॉट्‌सॲप असेल किंवा फेसबुक, कोणत्याही माध्यमाचा वापर करताना त्याच्या गरजा व ‘क्रिएटीव्हिटी’सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. 
-अवधूत नवले, व्यावसायिक (सोशल मीडिया)  

व्हॉट्‌सॲप ब्रॉडकास्ट लिस्ट व ग्रुपची क्रेझ
इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात ‘व्हॉट्‌सॲप’ तयार करून त्यात सामान्य नागरिकांना सामावून घेत आहेत. त्यातही महिला, युवक-युवतींचा ग्रुप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोनशेहून अधिक ‘व्हॉट्‌सॲप ग्रुप’ करण्याचे इच्छुकांचे नियोजन आहे. त्याची जबाबदारी निश्‍चित केली असून, त्या त्या भागातील समस्या ‘शेअर’ करून त्यावरील उपाययोजना कशा करता येतील, याची माहिती देण्यात येते. इच्छुकाने केलेली कामे, त्याचा परिणामांची माहिती दिली जाते. त्यावरील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून त्या वेगवेगळया ग्रुपवर टाकल्या जातात. ग्रुपमध्ये स्वतःला ‘ॲड’ करवून घेण्यास विरोध असलेल्या नागरिकांसाठी ‘ब्रॉडकास्ट लिस्ट’चा वापर केला जातो. 

‘फेसबुक पेज’ 
‘फेसबुक अकाउंट’वर ‘फ्रेंड लिस्ट’मध्ये सामावून घेण्यासाठी मर्यादा असल्याने राजकीय नेत्यांकडून हजारो-लाखो चाहते, कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्यासाठी ‘फेसबुक पेज’चा वापर केला जात आहे. या पेजवर इच्छुकांच्या छायाचित्रासह त्याने केलेली कामे, प्रचार सभा, रॅलीचे फोटो, अपडेट्‌स, भविष्यातील कामांच्या नियोजनाच्या ‘पोस्ट’ टाकल्या जातात. एखाद्या व्यक्तीने पेज लाइक केल्यानंतर त्याला त्या पेजवर येणाऱ्या सर्व पोस्ट, फोटो इत्यादीची माहिती स्वतःच्या टाइमलाइनवर दिसू लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com