आतापर्यंत फक्त ५६ अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी, बुधवारी ३७ अर्ज दाखल झाले आहेत, तर आतापर्यंत ५६ अर्ज आले आहेत. त्यांत विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत शुक्रवार (ता. ३)पर्यंत आहे.

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी, बुधवारी ३७ अर्ज दाखल झाले आहेत, तर आतापर्यंत ५६ अर्ज आले आहेत. त्यांत विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत शुक्रवार (ता. ३)पर्यंत आहे.

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. त्यानुसार गेल्या सहा दिवसांमध्ये ५६ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी राहिला, तरी एकाही राजकीय पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढले नाही. पहिल्या पाच दिवसांमध्ये, म्हणजे मंगळवारी दुपारपर्यंत केवळ १९ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते. परंतु, ‘एबी’ फॉर्म प्रत्यक्ष सादर करावयाचा असल्याने इच्छुकांनी आता ऑनलाइन अर्ज भरून त्याची छायांकित प्रत निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत ३७ जणांनी अर्ज भरल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिली.    

राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, असेही सांगण्यात आले.

मदत कक्ष सुरू
ऑनलाइन अर्ज भरताना http://panchayatelection.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, ते ‘हॅंग’ होत असल्याची तक्रार अर्ज भरणाऱ्यांनी केली असून, त्यामुळे वेळ जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, याकरिता मदत कक्ष सुरू केला आहे. त्या माध्यमातून अडचणी दूर करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.