विविध बाहुल्या पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

पुणे - बाहुली म्हटली की आपल्या डोळ्यांपुढे चटकन येते ती खेळण्यातली बाहुली. आपल्या लहानपणी मित्र-मैत्रीणींमध्ये खेळले जाणारे बाहुल्यांचे विविध खेळ. बाहुला-बाहुलीचं लग्न, छोटुशा बाळाला कंटाळा येऊ नये, म्हणून हातात दिली जाणारी बाहुली किंवा फारतर जरा मोठ्या वयात खेळायला हमखास असणारी बार्बी-डॉल... पण या सगळ्या झाल्या खेळण्याच्या बाहुल्या. जगात अनेक देशांत शोभेची वस्तू म्हणून दिवाणखान्यात, शो-केसमध्ये आणि इतरही ठिकाणी सजवल्या जाणाऱ्या ‘शो-डॉल्स’ या आपल्याकडल्या बाहुल्यांपेक्षा वेगळ्या. आता या शो-डॉलचं प्रमाण आपल्याकडेही बऱ्यापैकी वाढू लागलंय...

गेली पंधरा वर्षं पुणेकरांना अशाच आगळ्यावेगळ्या शो-डॉल्सचं दर्शन घडविणाऱ्या जयंत साठे यांनी बनवलेल्या जपानी आणि भारतीय बाहुल्यांच्या प्रदर्शनाचं यंदा पंधरावं वर्षं आहे. त्यानिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी हे निरीक्षण नोंदवलं. आपल्याकडेही आता शोभेच्या बाहुल्या घरांत ठेवण्याची नवी संस्कृती रुजू पाहत आहे. विशेषतः परदेशात जाऊन आलेल्या अनेक जणांमुळे आता हा बदल घडत आहे, असे साठे म्हणाले.

हातपंख्याने वारा घेत राजेशाही थाटात बसलेली राणी... बासरीच्या सुरात तल्लीन झालेली तरुणी... किंचित मान खाली करत समोरील व्यक्तीचा आदर व स्वागत करणारी... हातात भाला घेऊन लढण्यासाठी सज्ज असलेला निंजा योद्धा... उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून विशिष्ट प्रकारची ‘हॅट’ घातलेली तरुणी... अशा जपानी पेहरावातल्या आणि जपानी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आगळ्यावेगळ्या बाहुल्या साठेंच्या प्रदर्शनात पाहायला मिळतात. शिवाय लावणी, कथक, कथकली, मणिपुरी, भरतनाट्यम्‌ हे नृत्यप्रकार सादर करणाऱ्या भारतीय बाहुल्याही प्रदर्शनात असतात. यंदा तर त्यांच्या संग्रहात तुलनेने आकाराने मोठ्या अशा चौदा इंची बाहुलीची भर पडली आहे. 

शालेय सुट्यांचे औचित्य साधून क्रिएटिव्ह हॅंड्‌स यांच्या वतीने साठे यांचे जपानी व भारतीय बाहुल्यांचे प्रदर्शन आयोजिण्यात आले आहे. सोमवार (ता. १) ते बुधवार (ता. ३) दरम्यान सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत ते बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी खुले राहणार आहे.