मोजक्‍याच नवीन चेहऱ्यांना संधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पुणे - वेगाने बदलणाऱ्या पुण्याचा बहुतांश मतदार तरुण असताना काँग्रेसची या निवडणुकीतील भिस्त मात्र विद्यमान नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांवरच आहे. मोजक्‍याच नवीन चेहऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना यात संधी मिळाल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये काँग्रेसकडे येणाऱ्या तरुण आणि शिक्षित मतदारांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नवीन चेहरा आणि निवडून येण्याची क्षमता या निकषांवर उमेदवारी देण्याचे काँग्रेस नेतृत्वाकडून सांगण्यात येत होते; पण प्रत्यक्षात जेमतेम 15 नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे काँग्रेसच्या उमेदवार यादीचा आधार घेत पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सर्व भिस्त विद्यमान आणि काँग्रेसच्या नेत्यांवरच असल्याची माहिती त्यांनी दिली.

काँग्रेस भवनात जाणवणारा उत्साह आघाडीच्या चर्चेनंतर मावळला. त्याबरोबरच काँग्रेसमधून वेगाने "आउटगोइंग' सुरू झाले. मागील निवडणुकीत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झालेल्या नगरसेवकांनीही राजीनामे दिले. त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आलेल्या रवींद्र धंगेकर अशा मोजक्‍याच नेत्यांचे काँग्रेसमध्ये "इनकमिंग' झाले. त्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, काँग्रेसच्या अधिकृत यादीवर टाकलेल्या नजरेतून पक्षाने मोजक्‍याच उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.