पानवडी टॅंकरमुक्त अन्‌ शिवारही जलयुक्त

पानवडी टॅंकरमुक्त अन्‌ शिवारही जलयुक्त

वर्षानुवर्षे भेडसावणारा पाणीप्रश्‍न महिलांनी ग्रामसभेत मांडला. ग्रामस्थांनीही तो सोडविण्याचा निर्धार केला. ‘तनिष्कां’नी पुढाकार घेतला. प्रशासन आणि खासगी संस्थांनी सकारात्मक साथ दिली. या प्रयत्नांतून अवघी ६०० लोकसंख्या असलेल्या पानवडीत (ता. पुरंदर) तब्बल ४५ कोटी लिटर पाणीसाठा झाला अन्‌ गाव कायमस्वरूपी टॅंकरमुक्त झाले. त्याचबरोबर गावाचे शिवारही जलयुक्त झाले. 

पुण्यापासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या या गावाची ही जलकथा. पुरंदर किल्ल्याला लागून असलेल्या वज्रगडाच्या पायथ्याशी वसलेले आणि चार वस्त्यांत विभागलेले निसर्गसंपन्न गाव. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे रुद्रावतार धारण करणाऱ्या नदीला म्हणूनच रुद्रगंगा हे नाव पडले, असे गावकरी सांगतात. पण गेल्या काही वर्षांत रुद्रगंगा जणू पानवडीवर रुसलीच होती. आलेले पाणी गावात न ठेवता पुढे जात होते. मुसळधार पावसातील प्रचंड प्रवाहबरोबरच भलामोठा गाळही तिने पोटात साठवून घेतला होता. परिणामी, भरपूर पाऊस पडूनही, पावसाळा संपताच डोईवर हंडे घेऊन दऱ्याखोऱ्या धुंडाळण्याची वेळ इथल्या महिलांवर आली होती. ‘तनिष्का’ गटानं या वेदना दूर करण्याचे ठरवले अन्‌ तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर पानवडी टंचाईमुक्त झाली. 

पूर्वीची स्थिती?
पानवडीचं पर्जन्यमान जवळपास १२०० मि.मी.हून अधिक. गावामध्ये सन १९८७ च्या आसपास रुद्रगंगा नदीवर पाटजाई बंधारा बांधण्यात आला. मात्र त्यानंतर त्यात पाण्यासोबत गाळही साठत होता. पावसाचे बहुतांश पाणी वाहून जात होते. त्यामुळे जानेवारीतच महिलांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत होती. गावकऱ्यांकडून फेब्रुवारीत प्रशासनाकडे टॅंकरची मागणी होत होती. स्थिती एवढी गंभीर झाली होती, की शेतीला पाणी नसल्याने, पर्यायाने उत्पन्नाचे साधन नसल्याने सहाशे लोकसंख्या असलेल्या या गावातील अनेक ग्रामस्थ उदरनिर्वाहासाठी सासवड, पुण्यात स्थलांतरित झाले. 

‘तनिष्का’च्या महिलांच्या पुढाकारातून पाणीसमस्या मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. पहिल्या वर्षी छोट्या बंधाऱ्यातील गाळ काढला. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्‍न दोन महिने सुटला. या यशामुळे उत्साहित झालेल्या ग्रामस्थांनी पाटजाई पाझर तलावातील गाळ काढायचे ठरवले. एक हजार फूट लांब, २०० फूट रुंद आणि १० ते १५ फूट उंच असा गाळ काढण्यात आला. गेल्या पावसाळ्यात त्यात सुमारे ८ कोटी लिटरचा पाणीसाठा झाला. त्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून अडीच लाख रुपये देण्यात आले. हा पाणीसाठा गावाला सुमारे दोन वर्षे पुरेल इतका होता.

पानवडीमध्ये एवढे मोठे काम उभे राहिल्याने ‘तनिष्का’सह विविध खासगी संस्था एकत्र आल्या. त्यातून गावात निर्धूर चूल, पीकपद्धती, एक वस्ती एक गोठा आदी योजना राबविण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता आणण्यात आली. गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, या योजना स्वीकारल्या. पानवडीमध्ये सुरू असलेल्या कामे प्रशासनापर्यंत पोचल्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

पानवडीमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून ‘सीएसआर’च्या माध्यमातून माती आणि सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे गावासाठी पाण्याचे २२ स्रोत निर्माण झाले. त्यासाठी सरकारकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.

पानवडीतील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या सुटली आहे. आता मात्र जे पाणी उपलब्ध आहे त्याचा ताळेबंद आम्ही गावकरी मांडणार आहोत. पाणी कसेही न वापरता त्याच्यासाठी जलसंहिताही ठरविण्यात येणार आहे.
- हरिभाऊ लोळे, माजी सरपंच, पानवडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com