दुबई, अमेरिकेमधील रद्दीलाही ‘भाव’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे - भारतीय रद्दीचा दर्जा सुमार असल्याने कागद निर्माण करणाऱ्या येथील गंगा पेपर इंडिया कंपनीला रद्दी चक्क अमेरिका आणि दुबईतून आयात करावी लागत आहे. त्यामुळे इंधन, नोकऱ्या, व्यापार आदी क्षेत्रांत पुढे असलेली दुबई आणि अमेरिका ‘रद्दी’तसुद्धा भाव खाऊन गेल्याचे चित्र आहे.  

पुणे - भारतीय रद्दीचा दर्जा सुमार असल्याने कागद निर्माण करणाऱ्या येथील गंगा पेपर इंडिया कंपनीला रद्दी चक्क अमेरिका आणि दुबईतून आयात करावी लागत आहे. त्यामुळे इंधन, नोकऱ्या, व्यापार आदी क्षेत्रांत पुढे असलेली दुबई आणि अमेरिका ‘रद्दी’तसुद्धा भाव खाऊन गेल्याचे चित्र आहे.  

वृत्तपत्रे, वह्या, पुस्तके तयार करण्यासाठी लागणारा न्यूज प्रिंट आणि पॅकिंग बॉक्‍ससाठी लागणारा क्राफ्ट कागद तळेगाव दाभाडे येथील या कंपनीत तयार होतो. येथून तो देशभर वितरित होतो. या कंपनीला भेट देऊन ‘सकाळ’ने कागदनिर्मितीची पाहणी केली. या वेळी न्यूज प्रिंट आणि क्राफ्ट कागदाचे उत्पादन, विक्री, त्याची मागणी आदीबाबतची माहिती कंपनीचे व्यवस्थापक व्ही. एस. द्विवेदी यांच्याकडून जाणून घेतली. 

द्विवेदी म्हणाले, ‘‘रद्दीचा कागद दुबई आणि अमेरिकेतून आयात करण्यात येतो. त्या ठिकाणी लाकूड उत्पादनाचे प्रमाण अधिक असल्याने एकदा वापरलेल्या कागदाचे रिसायकलिंग होत नाही. तो कागद भारतात येतो. त्याचा दर्जा उत्तम असल्याने त्यावर प्रक्रिया करून तयार झालेल्या कागदाला अधिक पांढरा रंग प्राप्त होतो. भारतातील रद्दीचे अनेक वेळा रिसायकलिंग झालेले असते. त्यामुळे त्याचे आयुर्मान कमी असते. परिणामी, परदेशातून आयात केलेली रद्दी वापरावी लागते.’’

‘‘कंपनीत क्राफ्ट पेपर आणि न्यूज प्रिंटनिर्मितीची दोन युनिट असून, प्रत्येकी ७५ टन असा एकूण १५० टन कागद तयार करण्याची त्यांची क्षमता आहे. दररोज सुमारे १२० टन कागदाचे उत्पादन येथे काढण्यात येते. त्यासाठी सुमारे १६० टन रद्दी लागते. भारतीय रद्दीच्या दर्जानुसार परदेशातील रद्दी किती वापरायची याचे प्रमाण ठरते. दररोज अंदाजे १०० टन भारतीय, तर ५० टन परकीय रद्दी वापरावी लागते,’’ असेही द्विवेदी यांनी सांगितले.

अशी होते कागदाची निर्मिती
रद्दी सुरवातीला फिरत्या पट्ट्यावर (फिडिंग कन्वेअरमध्ये) टाकली जाते. ती एका मोठ्या मिक्‍सरमध्ये पडते. त्यानंतर तिला उष्णता देत पाण्यात एकत्रित करून पल्पिंग करण्यात येते. या ठिकाणी पाणी आणि रद्दीपासून बनलेले पातळ द्रव्य प्रक्रिया होत पुढे दोन हौदात वेगळे होते. त्यांचे वेगवेगळ्या यंत्रांद्वारे शुद्धीकरण करण्यात येते. त्यानंतर तयार झालेला कागदाचा पातळ लगदा वाहिनीद्वारे दुसऱ्या युनिटमध्ये येतो. या ठिकाणी फिरत्या गोल यंत्रांची साखळी आहे. त्यात अडीच मीटर रुंदीचा फिरता रबरी पट्टा आहे. त्यावर द्रव्य स्वरूपातील लगदा सोडला जातो. यंत्रावरील उष्णतेमुळे पट्ट्यावरून पुढे सरकणाऱ्या पातळ लगद्याला हळूहळू घट्ट स्वरूप प्राप्त होते. शेवटी अडीच मीटर रुंदीचा कागदाचा पातळ थर एका ठिकाणी गुंडाळला जातो. त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार कटिंग करून त्याचे पॅकिंग केले जाते. 

Web Title: Paper scrap high rate In Dubai, USA