टपाल कार्यालयामध्ये पासपोर्ट सेवा केंद्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारे पासपोर्ट सेवा केंद्र दोन एप्रिल रोजी सुरू होणार आहे. हिंदुस्तान ऍन्टिबायोटिक्‍स कंपनीसमोरील टपाल कार्यालयामध्ये हे सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी कळवले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार आहे. विदेश मंत्रालय आणि टपाल विभाग यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या सेवा केंद्रामध्ये दररोज फक्‍त 50 नागरिकांना वेळ (अपॉइंटमेंट) देण्यात येणार आहे. कालांतराने त्यामध्ये वाढ करण्यात येईल. नागरिकांना ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. परंतु, वॉक इन आणि तत्काळ सेवेत पासपोर्ट काढणाऱ्या व्यक्‍तींना अर्ज करता येणार नसल्याचे गोतसुर्वे यांनी कळवले आहे.

नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनी सर्वप्रथम www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. फी ऑनलाइन भरायची असून अपॉइंटमेंटही ऑनलाइन घ्यायची आहे.
पासपोर्ट सेवा केंद्रासाठीच्या अपॉइंटमेंट 30 मार्च रोजी दुपारी बारा वाजता खुल्या करण्यात येणार आहेत. अपॉइंटमेंट असलेल्यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाईल. तत्काळमध्ये पासपोर्ट हवा आहे त्यांनी या केंद्रामध्ये अर्ज करू नये, असे आवाहन गोतसुर्वे यांनी केले.

ग्रामस्थांची सोय
पिंपरी- चिंचवड परिसराचा विकास वेगाने होत आहे, त्यामुळे नागरिकांसाठी हे केंद्र उपयुक्‍त ठरणार आहे. लोणावळा, तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव या भागातील नागरिकांना या सेवा केंद्राचा लाभ घेता येणार आहे. शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने इथून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे गोतसुर्वे यांनी स्पष्ट केले.

Web Title: passport service center in post office