राजगुरुनगर आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

भोरगिरी - राजगुरुनगर (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीत हलविण्यासाठी प्रयत्न करू, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. घोणे यांनी सांगितले. जागेच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत असल्याने केंद्राच्या इमारतीचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी राजगुरुनगरवासीयांनी केली आहे.

खेड तालुक्‍यातील इतर रुग्णालये चकाचक असताना राजगुरुनगर केंद्राची दुरवस्था झाली आहे. जेमतेम बाराशे चौरस फुटांत हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून पावसाळ्यात ती गळत असते. रुग्णांसाठी सहा खाटा आहेत. स्वच्छतागृहाची संख्या अपुरी आहे. परिसरात अस्वच्छता आहे. राजगुरुनगर व परिसरातून किमान दीडशे जण दररोज उपचारासाठी येत असतात. त्यांना बसायला पुरेशी जागा नाही. आजारी अवस्थेत त्यांना तासन्‌ तास उभे राहावे लागते.
या रुग्णालयासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना सध्या एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले. मात्र, काम सुरू होऊ शकले नाही. या रुग्णालयाच्या बाजूला पशुवैद्यकीय विभागाची नवीन इमारत आहे. ती पडून आहे. या इमारतीत तात्पुरते हे रुग्णालय हलवावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत डॉ. घोणे म्हणाले, की नवीन भरती नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. नवीन इमारत होण्यास विलंब लागणार आहे. जागेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पशुसंवर्धन विभागाच्या इमारतीत रुग्णालय नेण्यासाठी संबंधित खात्याच्या परवानगीची गरज आहे.

टॅग्स