सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे

pawna river
pawna river

सेवाभावी शेकडो लोकांनी ठरवले, शेकडो हात एकत्र आले तर किती सुंदर कार्य उभे राहते ते ‘पवनामायी जलपर्णीमुक्ती’ तसेच ‘झाडांचे खिळेमुक्ती’ या दोन अभियानातून दिसले. उठसूट फक्त आश्‍वासने देणारे राज्यकर्ते आणि भ्रष्टाचारात गढून गेलेल्या प्रशासनाच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. ज्या कामांवर सरकारी पातळीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र तेच काम लोक काही लाखांत करतात त्याचाही हा उत्तम नमुना आहे. खरे तर, जबाबदारी असलेल्या पण कुचकामी लोकांवर कारवाई व्हायला हवी. लाल फितीत अडकलेल्या सरकारी बाबूंना त्यात काहीच दिसत नाही, पण हे उद्याच्या क्रांतीचे बीज आहे. ‘अण्णा हजारे’ची चळवळ नंतरची ‘आप’ची निर्मिती हे त्याचे दाखले पुरेसे आहेत. त्यासाठीच जलपर्णी आणि खिळे मुक्ती अभियानातून पिंपरी चिंचवडचे राज्यकर्ते आणि प्रशासनाने धडा घ्यावा इतकीच अपेक्षा.

दीड हजार ट्रक जलपर्णी  अन्‌ हजार किलो खिळे
ध्येयवेडे तरुण काय करू शकतात, हे पवना नदी जलपर्णीमुक्ती अभियानात पाहायला मिळाले. गेले १८५ दिवस समाजकार्याचा हा अखंड यज्ञ सुरू आहे. ‘रोटरी क्‍लब’ म्हणजे निव्वळ फावल्या वेळेतील समाजकार्य या सज्ञेला फाटा द्यायचे काम वाल्हेकरवाडी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर या युवकाने केले. त्यांना बरोबरीने साथ दिली त्या सोमनाथ आबा मुसुडगे या पर्यावरणप्रेमीने. सुरवातीला पवना पात्रातील जलपर्णी काढायला मोरया गोसावी घाटावर सुरवात केली. पाहता पाहता शहरातील संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध कंपन्या, कामगार मंडळे, हाउसिंग सोसायट्या, शहरातील तमाम लब्धप्रतिष्ठित मंडळी त्यात सहभागी झाली. लाजेखातर काही नगरसेवक व काही अंशी राज्यकर्ते, प्रशासन सहभागी झाले. सलग सहा महिने काम सुरू राहिले आणि दहा किलोमीटरची हिरवी झालर पांघरलेली पवना नदी प्रथमच पावसाळ्यापूर्वीच नितळ झाली.

घायाळ, जखमी झाडे सुटली
‘अंघोळीची गोळी’ असे आगळेवेगळे नाव असलेल्या संघटनेने दुसरा अनोखा उपक्रम हाती घेतला. हजारो झाडांवर विविध जाहिरात कंपन्यांनी खिळे ठोकून लटकवलेले फलक कार्यकर्त्यांना खटकले. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पक्कड, हातोडा घेऊन एक-एक करत खिळे उपसून काढायला सुरवात केली. त्यात प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाने उडी घेतली. पुढे असंख्य कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सामान्य लोकांना हे काम आवडले म्हणून इथेही शेकडो हात एकत्र आले. आजवर जखमी झालेली हजारांवर झाडे खिळेमुक्त झाली. पाचशे किलोवर खिळे जमा झाले. दोन चळवळीतून उत्कृष्ट समाजकार्य उभे राहिले. कुठलाही राजकीय स्वार्थ नसलेले, निरपेक्ष, निःस्वार्थी लोक एका व्यासपीठावर आल्याने ही चळवळ झाली. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे’ या उक्तीची प्रचिती आली. समविचारी लोक एक झाले तर अशी असंख्य आदर्श कार्य निर्माण होऊ शकतात. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठीही अशी अपेक्षा आहे. असेच सर्वजण एकत्र आल्यास कितीतरी सुंदर स्वप्न सत्यात येतील. कारण अशी भावना असलेले लाखभर युवक या नगरात आहेत. एक ठिणगी वणवा पेटवू शकते. गावकीच्या गलिच्छ राजकारणात रुतलेल्या आपल्या शहराला त्याची प्रतीक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com