बंड शमविण्याचे बापटांचे प्रयत्न 

girish-bapat
girish-bapat

पिंपरी - पिंपरी- चिंचवड भाजपमध्ये उफाळलेला असंतोष थंड होईल आणि सर्व कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागतील, असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. उमेदवारी देताना डावलल्याने शहरातील जुन्या कार्यकर्त्यांत असंतोष खदखदत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर बापट बोलत होते. बापट यांच्या मध्यस्थीमुळे भाजपमधील सर्व बंडखोर शांत होण्याची शक्‍यता आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना डावे- उजवे करण्यात आले, प्रदेशाने निवडलेली यादी बदलण्यात आली, गडकरी गटाला प्राधान्य देऊन मुंडे गटाला डावलण्यात आले, अशी भावना जुन्या कार्यकर्त्यांत आहे. अशा सर्व असंतुष्टांची शनिवारी (ता. 4) पिंपरीत एक बैठक झाली, त्यास सुमारे तीनशे कार्यकर्ते उपस्थित होते. त्या वेळी बहुतेकांनी कडक शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. रविवारी (ता. 5) डॉ. आंबेडकर चौकात निदर्शने व प्राधिकरणात सामूहिक मुंडण करण्याचेही निश्‍चित झाले होते. मात्र, आज सकाळी काही इच्छुक व निवडक प्रमुख कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून पालकमंत्र्यांनी संवाद साधत "चुकीचा निर्णय घेऊ नका', असा संदेश दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या तलवारी म्यान करत आंदोलन गुंडाळले. 
या पार्श्‍वभूमीवर बापट म्हणाले, ""निवडणुकीसाठी प्रत्येकजण चांगल्या भावनेनेच उमेदवारी मागत असतो; पण पक्षाला सर्वांनाच उमेदवारी देता येत नाही. निवडून येण्याचे निकषही पक्षाला पाहावे लागतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्यावर अन्याय झाला, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, या कार्यकर्त्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, तसेच त्यांची नाराजी दूर करण्याचा निश्‍चित प्रयत्न केला जाईल. त्यांना समजावून सांगण्याचा व्यक्तीश: मी प्रयत्न करेन. सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदिलाने कामाला लागतील. निवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित आहे, असा मला ठाम विश्‍वास आहे.'' 

नाराज कार्यकर्त्यांना भेटणार 
दरम्यान, निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानंतर संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत बंडाचे निशाण हाती घेतले आहे. त्यांच्याशी लवकरच बोलणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. या संदर्भात मुंबईत रात्री उशिरा बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे; परंतु अशी कोणतीही बैठक होणार नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यासाठी आपण आज दिवसभर व्यग्र होतो, लवकरच पिंपरी- चिंचवडच्या कार्यकर्त्यांना भेटू, असे त्यांनी सांगितले. 

पक्षातील असंतोष लवकरच दूर होईल. सर्व उमेदवारांची नावे मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच निवडण्यात आली आहेत, त्यात कोणताही बदल केलेला नाही. 
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com