कुठे मोदींचा भाजप, कुठे आयात मंडळी 

कुठे मोदींचा भाजप, कुठे आयात मंडळी 

महापालिका निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी हा नेहमीचा रिवाज होता. आता दिवस भाजपचे असल्याने बंडखोरीचा फटका भाजपला बसणार असे दिसते. एकाचा तोटा तो दुसऱ्याचा फायदा, या न्यायाने राष्ट्रवादीला फायदा होणार हे सांगायला भविष्यकाराची गरज नाही. सत्तेला मुंगळे चिकटतात, तसे मतलबी लोक सत्तेच्या मागे धावतात. केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार पुढचे तीन वर्षे हटणार नाही. त्यातच नगरपालिकांमध्ये भाजप आल्याने कदाचित महापालिकासुद्धा भाजपच्या हातात येतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीचा भाव वधारला. कोटी-दोन कोटींनी लिलाव झाले म्हणतात. 

पिंपरी-चिंचवड शहरातसुद्धा भाजपमध्ये असंतोषाचा भडका उडाला. जुन्या जाणत्यांची क्षमता नाही, कुवत नाही हे मान्य, पण त्यांना आस लागली होती. अत्यंत अपमानजनक परिस्थितीत त्यांना हाकललेच, घरातून बाहेर काढल्यासारखे झाले. त्यामुळे मंडळी संतापली, त्यांनी आंदोलन केले. दुसऱ्या दिवसापासून सामूहिक मुंडण वगैरे करणार होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी ते शमविले. हा सारा भाजपमधील राडा दहा दिवसांत संपला नाहीच, तर राष्ट्रवादीला सत्तेचा मार्ग निर्धोक झाला, अगदी मोकळा झाला.

भाजपचा मतदार करणार काय?
शहरात भाजपचा एक गठ्ठा मतदार तयार झाला आहे. गेली २० वर्षे ५० हजारांवर ही मते पुढे सरकत नव्हती. लोकसभेला आणि नंतरच्या विधानसभेला हा आकडा दोन-अडीच लाखांवर हेलकावत राहिला. त्यामुळे भाजपच्या अपेक्षा वाढल्या. हा मतदार मध्यमवर्गीय आहे, शिस्तबद्ध आहे. त्यांना गुंडागर्दी, भ्रष्टाचारमुक्त कारभार हवा. दुर्दैव असे की, ते सर्व विसरून सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी सुरू झाल्या. परिणामी हा मतदार दुखावला आहे. आज शहर भाजप फुगली, पण त्यात राष्ट्रवादीची खोगीर भरती झाली. ज्यांना शिव्याशाप दिले तेच पक्षात आले. आता त्यांनाच मते कशी द्यायची ही त्यांची समस्या आहे. त्यांचा कोंडमारा झाला, कार्यकर्ते आतून रडतात. मूळच्या भाजपचे ४८ इच्छुक होते. त्यापैकी  फक्त १२ जणांना (एकनाथ पवार, शीतल शिंदे, रवी लांडगे, केशव घोळवे, ज्योतिका मलकानी, शारदा सोनवणे, नामदेव ढाके आदी) संधी मिळाली. ज्यांनी रोपाला पाणी घातले ते महेश कुलकर्णी, अमोल थोरात, महेंद्र बाविस्कर, लहू धोत्रे यांना उमेदवारी द्या, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खास शिफारस होती. नव्या कारभाऱ्यांनी तीसुद्धा धुडकावली. देशाची सूत्रे आज संघाच्या हातात आहे आणि इथे ते संघालाही कोलतात. याचा अर्थ यांना अद्याप संघ आणि संघाचा संस्कार, भाजपही कळलेली नाही. ही गावगुंडी, मनमानी, मस्ती संस्कारात बसत नाही. देव, देश, धर्मासाठी बाजी लावणारी ही मंडळी भ्रष्ट मार्ग चोखाळणार का? हा खरा प्रश्‍न आहे. भाजपची अडीच लाख सदस्य नोंदणी झाली. दोन लाख मतदारांची पुंजी आहे. हे दान आयात उमेदवारांच्या पदरात पडेल का, याबाबत साशंकता आहे. निवडून नाही आलो, तरी चालेल पण पाडायचे काम करू, या इराद्याने मूळचे भाजपतील ३० उमेदवार आता ‘अपक्ष’ लढत आहेत. असे झाले तर राष्ट्रवादीचाच फायदा आहे. 

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ‘बी’ 
‘भाजप आणि संघाचा संस्कार औषधाला तरी शिल्लक राहणार का ?’ असा मार्मिक प्रश्‍न एका कडव्या भाजप पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. त्यांच्या मते आजची ही लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी वरवर असली तरी त्यात खरी भाजप आहे कुठे. लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ‘बी’ टीम अशीच आहे. संघाच्या लोकांना या आयात मंडळींनी अक्षरशः कात्रजचा घाट दाखवला. आज हीच मंडळी भाजप संपवायला निघालीत. स्वार्थासाठी या लोकांनी एकाच जागेसाठी दोन-दोन उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केला आणि गोंधळ घातला. सर्वेक्षणाच्या नावाखाली खाडाखोड करून उमेदवारांची नावे बदलली. एका बड्या नेत्याने उमेदवारी विकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणी पुराव्यासह वरिष्ठांपर्यंत सर्व माहिती गेली. सर्व गोंधळात गोंधळ आहे. त्यामुळे भाजपच्याच मतदारांना प्रश्‍न पडला आहे की, भाजपचा उमेदवार कुठेय, मग मते द्यायची कुणाला. संत तुकाराननगरच्या एका संघ स्वयंसेवकाने बोलताना आम्ही प्रसंगी ‘नोटा’ दाबणार अशी सूचक प्रतिक्रिया दिली. भाजपतील सद्य स्थिती दर्शविणारी ही अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादीला सत्ता तशी दूर आहे, पण भाजपलाही वाटते तितके सोपे नाही. ही वाट त्रिशंकूच्या दिशेने जाते बरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com