औद्योगिक सुटीचा साधला मुहूर्त

औद्योगिक सुटीचा साधला मुहूर्त

पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज (गुरुवारी) औद्योगिक सुटीचा पहिला दिवस सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी गाजविला. बहुतांश औद्योगिक कारखाने, कंपन्यांना सुटी असल्याने उमेदवारांनी विविध भागांत पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी व भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे व डावलल्यामुळे नाराज असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची गैरहजेरी प्रचारात जाणवत आहे. 

भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपाइं, एआयएमआयएम तसेच अपक्ष उमेदवारांनी चिखली, कुदळवाडी, शाहूनगर, इंद्रायणीनगर, भोसरी गावठाण, मोशी, चऱ्होली, दिघी कासारवाडी, दापोडी, तसेच निगडी, तळवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी, सांगवी आदी भागांत आज सकाळपासूनच घरोघरी भेटीगाठी तसेच पदयात्रा काढल्या.  काही ठिकाणी उमेदवारांबरोबर पक्षाचे वरिष्ठ नेतेही प्रचारात सहभागी झाले. 

भोसरी गावठाणात लहान-मोठ्या वसाहती, सोसायट्या आणि चाळींमध्ये घरोघरी जाऊन राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले. या वेळी मतदारांनी आपल्या भागातील सार्वजनिक प्रश्‍नाकडे उमेदवारांनी लक्ष्य घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. काही मतदारांनी तुंबलेली गटारे, रस्त्यांची दुरवस्था व पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर निवडून आल्यावर प्रश्‍न निश्‍चित मार्गी लावू, असे आश्‍वासन उमेदवारांनी दिले. सर्वच पदयात्रांमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. सर्व पक्षांचे चार-चार उमेदवार एकत्र फिरताना दिसले.

थेरगाव भागात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी पदयात्रा काढली. या पदयात्रेला पोलिस बंदोबस्त होता. उन्हाची तीव्रता वाढल्याने कार्यकर्त्यांनी सकाळी लवकरच पदयात्रेला सुरवात केली. या भागात शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांच्याही प्रचार फेऱ्या काढल्या. 

रावेत, पुनावळे भागात विविध पक्षांनी प्रचार फेऱ्या काढल्या. चिखली भागातील कामगार वसाहती व सोसायट्यांकडे सर्वच कार्यकर्त्यांनी आज मोर्चा वळविला. घरोघरी हॅण्डबिल वाटत कार्यकर्ते पक्षाचे चिन्ह आवर्जून मतदारांना सांगत होते. 

पिंपरीत रॉक्‍सी चौकाजवळ, नाणेकर चाळीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोपरा सभा झाली. पिंपरीगाव आणि प्राधिकरणात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही घरोघरी प्रचार केला. 

रिपाइंच्या तीन उमेदवारांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने दापोडी, किवळे आणि पिंपरी गावांत रिपाइं उमेदवार कमळ व भाजपचा झेंडा घेऊन प्रचार करताना दिसले. येथील तीन उमेदवारांना निलंबित केल्याने रिपाइंत ऐन निवडणुकीत फूट पडताना दिसत आहे. त्यामुळे या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात अजूनही जोर दिसलेला नाही.

नाराज कार्यकर्ते प्रचारापासून दूर
शहराच्या अंतर्भागात भाजपच्या प्रचार फेऱ्यांमध्ये अजूनही जुन्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसत नाही. त्यामुळे अद्यापही जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर झालेली नसल्याचे स्पष्ट जाणवले. निगडी-प्राधिकरण, नेहरुनगर, खराळवाडी, चिंचवड, संत तुकारामनगर भागांतील भाजपचे जुने कार्यकर्ते प्रचारात दिसले नाहीत. रहाटणी, काळेवाडी भागांत जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते अपक्ष उमेदवाराचा प्रचार करताना दिसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com