हाडवैरी नेत्यांचे गळ्यात गळे, कार्यकर्त्यांचे मात्र हाल 

pcmc
pcmc

राजकारणाचा नाद केला, की घराची राखरांगोळी ठरलेली. सतत व्यवहारी राहिलेल्या नेत्यांचे ठीक असते; पण आयुष्य वाहून घेतलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हाल वाईट. कोणासाठी आणि कशासाठी आटापिटा करतो, हे समजेपर्यंत वय निघून जाते. कोणाची पालखी वाहतो ते समजत नाही. कोण कसा वापर करतो ते उमगत नाही. जरी कळले, तरी वेळ गेलेली असते. नंतर डोक्‍यावर हात मारण्याशिवाय पर्याय नसतो. असे पश्‍चाताप झालेले हजारो कार्यकर्ते आज शहरात आहेत. कोणाचा झेंडा मिरवायचा, कोणाचा प्रचार करायचा, अशा संभ्रमात दोन पिढ्यांची बरबादी झाली. सतरंज्या उचलण्यावारी घरदार आणि संसाराची राखरांगोळी केलेली ही मंडळी हाच आता चर्चेचा विषय आहे. असेच होत राहिले, तर राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे यावरचा विश्‍वास उडेल. चांगले कार्यकर्ते निपजणार नाहीत. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, मनसे, रिपाइं कोणी कोणी मागे नाही. सब घोडे बारा टक्के. हे बदलायचे असेल, तर निष्ठावंतांची कदर केली पाहिजे. नेत्यांनी न्याय दिला पाहिजे. सेवेचा मोबदला म्हणून हारतुरे, मानसन्मान मिळाले पाहिजेत; अन्यथा राजकारण ही एक बाजारपेठ होईल. हे बदलणे शक्‍य आहे. जे प्रामाणिक आहेत, "कार्यकर्ता' या व्याख्येत बसतात, समाजाची सतत काळजी वाहतात, असे लोक महापालिका सभागृहात आले पाहिजेत. भले ते फाटके असोत, कफल्लक असू देत. सच्चाईची कदर केली पाहिजे. 

जगताप वि. पानसरे वि. बारणे 
शहराच्या राजकारणात कार्यकर्ते सडले गेले. पूर्वी विधानसभेला गजानन बाबर विरुद्ध आझम पानसरे, अशी लढाई झाली होती. त्या वेळी व्यापारी सांगत, की हे दोघेही व्यवसायातील एकमेकांचे भागीदार होते. पुढे लोकसभेलाही तोच खेळ रंगला. दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. असंख्य व्यापारी, उद्योजक आणि कार्यकर्ते हे दोघांचे समान मित्र. राजकारणात तेसुद्धा भरडले गेले. पुढे निकालानंतर वाद मिटला आणि दोघांचा समेट झाला. आजचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हेसुद्धा व्यावसायिक भागीदार. त्यांचे कार्यकर्ते, मित्र एकच होते. राजकारणात मैत्रीचे रूपांतर वैरात झाले आणि संबंध दुरावले. कुचंबणा झाल्याने दोघांचे कार्यकर्तेही पांगले. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि आमदार महेश लांडगे यांचे नातेसंबंध. राजकारणात त्याचाही निकाल लागला आणि कार्यकर्ते दुभंगले. शिवसेनेचेच कार्यकर्ते मनसेच्या तंबूत गेले. कॉंग्रेसचेच कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. पूर्वी एकमेकांच्या विरोधात गळा ताणून बोलणारे नेते आज गळ्यात गळे घालून मिठ्या मारतात. मात्र, त्यांच्यासाठी ज्यांनी दोन हात केले त्या कार्यकर्त्यांचे मन काय म्हणत असेल, ते देव जाणो. काल राष्ट्रवादीत होते, तेच आज भाजपमध्ये आहेत. भाजपचे निष्ठावंत ज्यांच्या विरोधात भांडले त्याच नेत्यांच्या पालख्या उचलण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. सर्व पक्षांत हाच सावळागोंधळ आहे. आझमभाईंचे समर्थक राष्ट्रवादीतच राहिले. आता भाजप विरुद्ध म्हणजे आझमभाईंच्याच विरोधात ते गरळ ओकणार आहेत. 

एकीकडे शहरातील शिवसेना कॉंग्रेसच्या मंडळींनी हायजॅक केली, तर पूर्ण भाजप अगदी मुळासकट राष्ट्रवादीच्या तमाम नेते आणि कार्यकर्त्यांनी गिळंकृत केला. कोण कोणाविरुद्ध का बोलतो, याला काहीही अर्थ नाही. भाजपच्या काही निष्ठावंतांनी उठाव केला. राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाल्याने तिथे उठाव करायला कोणी शिल्लक नाही. "एचए' कंपनीचा कामगार नेता अरुण बोऱ्हाडे याच्यासारखा एक कट्टर पवारनिष्ठ मोशीतील जागेसाठी उमेदवारी मागतो. त्याला खिशात दोन कोटी आहेत का, अशी विचारणा एक नेता करतो. साठीकडे वाटचाल करणारे महेश कुलकर्णी यांच्यासारखे कट्टर भाजप कार्यकर्ते चिंचवडगावात उमेदवारी मागतात, तेव्हा आर्थिक स्थितीचे कारण देत नकार घंटा वाजते. ही काही वाणगीदाखल नावे. असे असंख्य आहेत. नेत्यांनी तत्त्व, निष्ठा यांना तिलांजली दिल्याने आता कार्यकर्ते दोन पावले पुढे आहेत. त्यांनीही कंबरेचे सोडले आणि विचार आचाराशी सुसंगत नसलेल्यांशी ते संग करू लागले. राजकारण इतके भरकटलेले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची व्यथा सोशल मीडियावर वाचून कार्यकर्त्यांचे दुःख समजले. भाजपमध्ये आलेले काही गावगुंड आपल्याच आचारविचारांची आपल्याच डोळ्यांसमोर कशी होळी करतात ते पाहून ही मंडळी ढसाढसा रडतात. सत्ता नको; पण हे नेते आवरा, असे संघाचे लोक बोलू लागले आहेत. निवडणुकीला दिशा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले; पण स्थिती हातात न राहिल्याने त्यांनीही अंग काढून घेतले. या महापुरात सज्जन कार्यकर्ते वाचले तरी पुरे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com