‘मोका’तील आरोपी तुमचे कारभारी होणार का? 

‘मोका’तील आरोपी तुमचे कारभारी होणार का? 

राजकारणात अनुभव, शिक्षण, चारित्र याहीपेक्षा मनी, मसल पॉवरला महत्त्व होते, आहे आणि यापुढेही राहणार. घटना, संविधान भले समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाची भाषा बोलू देत. इथे राजकारणात जात, धर्म, भाषेलाच अधिक महत्त्व दिले जाते. विसंगतीने ओतप्रोत भरलेले हे एक कटू सत्य आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १३ राजकीय पक्षांचे ५३८ आणि अपक्ष २३६ मिळून एकूण ७५८ उमेदवार रिंगणात आहेत. या मंडळींच्या शैक्षणिक पात्रता, सामाजिक कार्य, कौटुंबिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत, स्थावर जंगम मालमत्ता किती, गुन्हे किती, चरित्र काय बोलते याची कुंडली नजरेखालून घातली. सर्वांत डोळे दिपविणारी बाब म्हणजे कोट्यवधींची संपत्ती. अवघे सात हजार रुपये मानधन असलेल्या नगरसेवक पदासाठी निवडणुकीत दोन-तीन कोटी रुपये उधळणाऱ्यांचे आश्‍चर्य वाटते. शिक्षणात ‘ढ’ असू देत राजकारणात डॉक्‍टरेट असलेले आहेत याचे समर्थन करताना हे लोक म्हणतात, की आता सातवी नापास खासदार, आमदार होतात मग आम्ही नगरसेवक झालो तर बिघडले कुठे? राजकारणाची घसरगुंडी किती झाली त्याची ही झलक आहे. सुमारे ७० टक्के उमेदवारांनी कागदोपत्री किमान दोन-तीन कोटींची मालमत्ता दाखवली. वार्षिक उत्पन्न पाच-सात लाख, पण निवडणूक प्रचाराचा खर्च कोटी रुपये. आमदनी चार आणा अन्‌ खर्चा रुपय्या.

पूर्वी फक्त राष्ट्रवादीकडे गुंठामंत्र्यांची भरती होती. त्यात प्रमुख कार्यकर्त्यांची संपत्ती किमान २५ ते ५० कोटी आणि नेत्यांची १०० कोटींच्या पुढे होती. या बाजारू मंडळींना भाजपचा भाव वधारल्याचे लक्षात येताच सर्व लोंढाच भाजपमध्ये घुसला. परिणामी, आज भाजप सावकार आणि राष्ट्रवादी... उरले सुरले कोट्यधीश काँग्रेस, शिवसेनेकडे आहेत. किलो किलो सोने, कोटींचे हिरे, माणक असलेले लोकनेते देशात सापडणार नाहीत, पण पिंपरी- चिंचवड शहरात आहेत. भ्रष्टाचार विरोधात पाच वर्षे अनवाणी फिरणारा मारुती भापकर याच्या सारखा फकीर कार्यकर्ता ही राजकारणाची व्याख्या ओळख पाहिजे होती. दुर्दैवाने आजच्या उमेदवार यादीत अगदी बोटावर मोजण्याइतकेच असे कार्यकर्ते दिसतात. प्रचाराचा खर्च भागविण्यासाठी एकाने एक एकर जमीन विकली. दुसऱ्याने नेत्याबरोबर भागीदारीत (जेव्ही) इमारतीचा करार केला. तिसऱ्याने थेट कोटी रुपयांचा सौदा केला. कारण रग्गटड काळा पैसा आजही तिजोरीत आहे. अशी बहुसंख्य मंडळी आमचे कारभारी होणार आहेत. 

खून, खंडणी, फसवणुकीचे गुन्हेगार किती?
पिंपरी- चिंचवड महापालिकेतील १२८ पैकी ४० सदस्य हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असल्याचे पोलिसांचे रेकॉर्ड सांगते. बोभाटा झाल्याने त्यात फरक पडेल, अशा लोकांना बाजूला केले जाईल असे वाटले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा तो शिरस्ताच आहे, किमान भाजप याबाबत दक्ष राहील अशी समजूत होती. सर्व मतदारांचाच कपाळमोक्ष झाला. कारण भाजपनेच सर्वाधिक गुन्हेगारांना उमेदवार केले. नवखे चेहरे असल्याने ही मंडळी मिसळून गेली होती, सर्वांमध्ये दडून बसली होती. आता एका एकाचे रेकॉर्ड बाहेर येते.

मोक्का आरोपी भाजपचे उमेदवार!
थेरगावात ‘मोका’तील एका टोळीचा म्होरक्‍या कुख्यात गुन्हेगार हाच भाजपचा उमेदवार आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे. विविध पाच पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर त्याच्या नावे गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादीलाही या विषयावर बोलायचा नैतिक अधिकार नाही. कारण तीन खुनाचे गुन्हे दाखल असलेला नगरसेवक उमेदवार आहे. शिवसेनेनेही तोडीस तोड म्हणून काळेवाडीत एका तडीपार गुन्हेगारालाच रिंगणात उतरवले. एका पक्षाचा उमेदवार थेट आरोपीच्या पिंजऱ्यात बसून उमेदवारी अर्ज दाखल करायला आला होता, हे दृश्‍य साऱ्या शहराने पाहिले. या महाभागाला भेटण्यासाठी भाटनगरच्या जनतेने गर्दी केली होती. कंबरेला पिस्तूल लावून उमेदवारी अर्ज दाखल करणारे नेतेही लोकांना दिसले. आकुर्डी परिसरात राष्ट्रवादीच्या कृपेने पत्नीसह रिंगणात उतरलेले एक कामगार नेते पिस्तूल घेऊनच प्रचार करतात. भोसरीचा प्रत्येक प्रभाग दडपणाखाली, दहशतीखाली आहे. पिंपरी गावात शिवसेना उमेदवार दत्ता वाघेरे यांच्या मुलावर प्रचार करताना वार झाले. गुन्हेगारांनी राजकारण ताब्यात घेतल्याचे असे शेकडो दाखले आहेत. पूर्वी तांदळात खडे होते, आता खड्यात तांदूळ शोधावा लागतो. हे बदलले पाहिजे. मतदार ते करू शकतात. आजही उडदामाजी काळे गोरे किंवा दगडापेक्षा वीट मऊ म्हणत चांगल्या लोकांना निवडता येईल. समाजात सज्जन, सुशिक्षित, कायद्याचे जाणकार, अनुभवी आहेत त्यांना मत दिले पाहिजे. एकही लायकीचा नसेल तर ‘नोटा’ दाबा पण मत द्या. घोषणेपुरते नको तर खरोखरच भय, भ्रष्टाचारमुक्त शहर करायचे असेल, तर निर्भयपणे अशा नाठाळांना मतपेटीतून नकार दिला पाहिजे. शहराचे राजकारण स्वच्छ करण्याची हीच एक नामी संधी आहे. अन्यथा ‘मूँहमे राम बगलमे सुरी’वाले राज्य करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com