राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही : अजित पवार

ajit.jpg
ajit.jpg

बारामती :  "सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही, त्या मुळे मतदारांनीच आतापासूनच  परिवर्तनचा संकल्प करावा" , अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले, आज शेतक-यांसोबतच व्यापारीही आत्महत्या करु लागले आहेत, नोटाबंदी व जीएसटीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, बँकांचा एनपीए काही लाख कोटींच्या घरात गेला आहे, आर्थिक आघाडीवर ना अर्थमंत्री लक्ष देत ना पंतप्रधान, त्या मुळे देशाची घडी विस्कटली आहे. शेतकरी सूचना देऊन संपावर जातात तरी सरकारला काहीही पडलेले नाही, या सरकारला म्हणायचे तरी काय...मोदीसाहेबांनी सांगितेलेले हेच ते अच्छे दिन आहेत ही भूमिका आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकांना जाऊन सांगायला हवी. 

धनगर आंदोलनावेळी पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो असे सांगणा-या मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून आरक्षणाची मागणी करणा-या कार्यकर्त्यांवर 307 कलमाचे गुन्हे लावले जातात, अरे काय मोगलाई लागून गेली आहे का?असा संतप्त सवाल करीत अजित पवार यांनी या कारवाईचा निषेध केला. 
उत्तरप्रदेशात योगी सरकार तर कर्नाटकात कुमारस्वामी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतात मग महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांना हे का जमत नाही, सगळच तर तुमच्या हातात आहे मग निर्णय का नाही घेत असा मुद्दा पवार यांनी उपस्थित केला. 
 

  • नागपूर अधिवेशनाबाबतही शंकाच

कापूस, सोयाबिन सारख्या विषयांना बगल देण्यासाठीच हिवाळीऐवजी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची कल्पना सरकारच्या सुपीक डोक्यातून निघाल्याची कोपरखळी त्यांनी मारली. या बाबत अधिवेशनात बोलणार असल्याचे ते म्हणाले. 
 

  • मग हिवाळ्यात मशीन गारठेल

उन्हाळ्यात उन्हाने ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे सांगितले जात असेल तर मग हिवाळ्यात मशीन गारठले म्हणून हे सांगणार का आणि पावसात बुरशी लागल्याचे कारण देणार काय, अशी टीका करत या बाबत लोकांच्या मनातली शंका दूर करण्याचे काम सरकारने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com