विकासात नागरिकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

या माध्यमातून नागरिकांना प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती देणे, नावीन्यपूर्ण कल्पना असलेले प्रकल्प राबविण्यासाठी नागरिकांची मते जाणून घेऊन त्यावर चर्चा घडवून आणणे, विविध सोयी सुविधा साकारण्यास चालना देणे इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास प्रक्रियेत नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सूचना, नावीन्यपूर्ण योजना आणि कल्पना प्राधिकरणाकडे पाठविता येणार आहे. प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी याबाबत पहिले पाऊल उचलले आहे.

प्राधिकरणाची स्थापना होऊन दोन वर्षे झाली आहेत. रिंग रोड आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो असे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधिकरणाने हाती घेतले आहेत. तसेच प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या सर्व विकास प्रक्रियेत नागरिकांचा अधिक सहभाग असावा, यासाठी गित्ते यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून पहिले पाऊल उचलले आहे. या माध्यमातून नागरिकांना प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती देणे, नावीन्यपूर्ण कल्पना असलेले प्रकल्प राबविण्यासाठी नागरिकांची मते जाणून घेऊन त्यावर चर्चा घडवून आणणे, विविध सोयी सुविधा साकारण्यास चालना देणे इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी "पीएमआरडीए'चे संकेतस्थळ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच फेसबुक पेज, इंस्ट्राग्राम यासारख्या माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी लोकशाही दिन
विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धर्तीवर पीएमआरडीएमध्ये लोकशाही दिन आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या अडीअडचणी, समस्या, तक्रारी प्राधिकरणाच्या आयुक्तांसमोर मांडता येणार आहेत. यामुळे या तक्रारींचा तत्काळ निपटारा होण्यास मदत होणार आहे. प्राधिकरणात पहिल्यांदाच लोकशाही दिनाचे आयोजन होत असून, पुढील महिन्यापासून हा उपक्रम सुरू होणार आहे.