पेट्रोलची 2 वर्षांत 19 रुपये दरवाढ

पेट्रोलची 2 वर्षांत 19 रुपये दरवाढ

पुणे - गेल्या दोन वर्षांत पेट्रोलच्या प्रति लिटरच्या भावात १९ रुपये, तर डिझेलच्या भावात गेल्या तीन वर्षांत १० रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसते. २०१६ च्या दराशी तुलना करता पेट्रोलची सरासरी ३० टक्‍के, तर डिझेलची सुमारे १५ टक्‍के दरवाढ झाली आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली, तर प्रति लिटरचा भाव लवकरच शंभरी गाठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

चार वर्षांत ८० रुपयांच्या पुढे
गेल्या वर्षीपासून प्रत्येक दिवसाला या दोन्ही इंधनांच्या भावात बदल होत आहे. जून महिन्याच्या अखेरीस पेट्रोलचा प्रति लिटरचा भाव ७७.१२ पैसे इतका होता. तो आज ८१.५४ रुपयांपर्यंत पोचला आहे. गेल्या नऊ महिन्यांत साध्या पेट्रोलच्या दरात ४ रुपये ४२ पैसे वाढ झाली. डिझेलच्या भावात गेल्या नऊ महिन्यांत ८.१७ रुपये आणि पॉवर पेट्रोलच्या भावात ४.४१ रुपये इतकी वाढ झाली. पेट्रोलचा दर गेल्या चार वर्षांत मार्च २०१६ मध्ये ६२ रुपये ५१ पैसे इतका कमी नोंदविला गेला. गेल्या चार वर्षांत मार्च २०१४ मध्ये पेट्रोलचा दर सर्वांत जास्त ८२.५४ रुपये इतका होता.  

सप्टेंबर २०१३ मध्ये पुण्यात पेट्रोलचा प्रति लिटरचा भाव हा ८४ रुपये १३ पैसे इतका उच्च झाला होता. त्या वेळी पॉवर पेट्रोलचा भाव हा ९३ रुपये ६८ पैशांपर्यंत पोचला होता. २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होऊ लागले होते, मे २०१६ पासून पुन्हा या दोन्ही इंधनांच्या भावात वाढ सुरू झाली. २०१६ मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला पंधरवडा वगळता पेट्रोलचे प्रति लिटरचे भाव हे ७० रुपयांच्या पुढेच राहिले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिना वगळता उर्वरित सर्व महिन्यांत पेट्रोलचा भाव हा ७५ रुपयांच्या पुढेच राहिला आहे. 

अन्य राज्यांमधील परिस्थिती? 
इंधनाच्या दरवाढीचा काँग्रेस आघाडीला निवडणुकीत फटका बसला. भाजप सत्तेवर आल्यानंतरही इंधनाच्या वाढीला लगाम लागला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते. आपची सत्ता असलेल्या दिल्ली येथे पेट्रोलचा प्रति लिटरचा भाव ७३.७३ रुपये आणि डिझेलचा भाव ६४.५८ रुपये, काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक राज्यात या दोन इंधनांचा प्रति लिटरचा भावा अनुक्रमे ७५ रुपये आणि ६५.७८ रुपये इतका आहे. भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये या इंधनाचा भाव अनुक्रमे ७२.५१ रुपये आणि ६८.७६ रुपये इतका आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचा दर अधिक आहे. 

कर कमी केल्यास ‘अच्छे दिन’?
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव कोसळल्यानंतरही ग्राहकाला त्याचा फायदा मिळत नाही. अबकारी करात सातत्याने वाढ केली जात आहे. पेट्रोलच्या करात तीन पटीने आणि डिझेलच्या करात पाच पटीने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात अकरा रुपये सर चार्ज आणि दुष्काळाच्या निमित्ताने लावलेला दोन रुपये सेस वसूल केला जातो आहे, त्याचप्रमाणे दारूची दुकाने बंद झाल्यानंतर महसुली तूट भरून काढण्यासाठी सुरू केलेला तीन रुपयांचा सेसही वसूल केला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने करात कपात केली, तर त्याचा ग्राहकांना फायदा होईल.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com