पेट्रोल पंपचालकांचे उद्या खरेदी बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदलणाऱ्या दरामुळे नुकसान होत असल्याचा दावा करीत पेट्रोल पंपचालकांनी बुधवारी (ता. 5) खरेदी बंद करण्याचे आंदोलन पुकारले आहे. यानंतरही केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही, तर 12 जुलैपासून बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

पुणे - पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदलणाऱ्या दरामुळे नुकसान होत असल्याचा दावा करीत पेट्रोल पंपचालकांनी बुधवारी (ता. 5) खरेदी बंद करण्याचे आंदोलन पुकारले आहे. यानंतरही केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही, तर 12 जुलैपासून बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होत असलेल्या बदलामुळे प्रत्येक पेट्रोल पंपचालकाचे प्रतिदिवशी 15 ते 25 हजार रुपये इतके नुकसान होत आहे. पूर्वी दरात बदल झाल्यानंतर होणारी नुकसानभरपाई संबंधित पेट्रोल उत्पादक कंपनी पंपचालकांना देत होती. आता ही भरपाईची रक्‍कम देण्याचे बंद झाले आहे, असे दि पूना पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सांगितले.

शहरातील पेट्रोल पंपचालकांचे प्रतिदिन एकूण एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. देशभरातील पेट्रोल पंपचालकांचे आत्तापर्यंत साडेचारशेहून अधिक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी "एआयपीडीए' या संघटनेने आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनाला असोसिएशनने पाठिंबा दिल्याचे धुमाळ यांनी नमूद केले.

दररोज बदलणाऱ्या दराबरोबरच इतर प्रश्‍न भेडसावत आहेत. लोणी येथील वितरण केंद्रात टॅंकरमध्ये शंभर ते दीडशे लिटर पेट्रोल कमी भरले जात आहे. ही पेट्रोलचोरी रोखली जात नाही. यामागे असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. पेट्रोल पंपचालकांना पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. पोलिसांकडून होणाऱ्या छळाचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात केवळ इंडियन ऑइल या कंपनीच्या पेट्रोलपंपांनाच लक्ष्य करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही धुमाळ आणि संघटनेचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी केला आहे.

टॅग्स