वाचलेली, ऐकलेली माणसं भेटीला

यशदा - ग्यान की विचार स्पर्धेतील मान्यवरांबरोबर पारितोषिक विजेते विद्यार्थी. या वेळी (डावीकडून) सीमंतिनी लोखंडे, किरण परदेशी, अनिल सुपानेकर, लतिका पाडगावकर, प्रभाकर करंदीकर, मिलिंद गुणाजी, रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार, प्रमोद चौधरी, प्रदीप लोखंडे
यशदा - ग्यान की विचार स्पर्धेतील मान्यवरांबरोबर पारितोषिक विजेते विद्यार्थी. या वेळी (डावीकडून) सीमंतिनी लोखंडे, किरण परदेशी, अनिल सुपानेकर, लतिका पाडगावकर, प्रभाकर करंदीकर, मिलिंद गुणाजी, रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार, प्रमोद चौधरी, प्रदीप लोखंडे

पुणे - पुस्तकातून ज्यांना वाचलं, ऐकलं; पण प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला नाही, ते दिग्गज आज त्यांच्यासमोर आले. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या यशाचं संचितही ऐकता आलं आणि भविष्याला दिशा मिळाली... 

राज्याच्या विविध ग्रामीण भागांतून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव. निमित्त होते ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी) आणि ‘ग्यान की’ या संस्थेने आयोजित केलेल्या विचार स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे. ‘२०१९ ते २०२४ : भारताचे ध्येय धोरण’ या विषयावर विचार स्पर्धा आयोजित केली होती.

यात खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणसह बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. यातील १७ विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. संस्थेचे प्रदीप लोखंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, उद्योजक प्रमोद चौधरी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, अभिनेता मिलिंद गुणाजी, माजी सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधता आला. 

‘क्रिकेटरला भाव मिळतो, मग शेतकऱ्याला का नाही’, ‘मला माझे गाव विकसित करायचे आहे. मी काय करू शकते’, ‘भारतातील बेरोजगारी दूर करण्यासाठी काय करायला हवे’, भारतातील लोक परदेशात गेल्यावर स्वच्छतेचे नियम पाळतात; मग इथे का नाही’, असे प्रश्‍न विद्यार्थ्यांनी धाडसाने विचारले. ‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबाने यांनी प्रास्ताविक केले.

लता मंगेशकर यांना क्रिकेट खेळायला सांगितले असते, तर त्या यशस्वी झाल्या असत्या का, तर नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे. त्यामुळे तुम्हीदेखील कशात उत्तम आहात, हे शोधा. केवळ पालक आणि शिक्षक म्हणतात, ते करियर म्हणून निवडू नका. तुम्हाला आवडतं ते शिका. इच्छाशक्ती हे तुमचं भांडवल आहे, त्या शिदोरीवर तुम्ही वाटचाल केली, तर यश तुमचंच आहे. 
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

ज्ञानाधिष्ठित समाज बनवायचा असेल, तर वाचले पाहिजे. वाचा, बोला, लिहा; पण त्यापुढे जाऊन कृतीदेखील करा. आपल्याला प्रश्‍न पडतात, त्या वेळी त्याची उत्तरेहीदेखील शोधता आली पाहिजेत. माझे प्रश्‍न माझे आहेत, त्याचे उत्तर मी शोधणार, हे ध्येय ठेवा आणि मोठे यश मिळविण्यासाठी आकांक्षादेखील मोठ्या ठेवा.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

ग्रामीण आणि शहरी भाग जोडण्याचा प्रयत्न स्पर्धेतून केला आहे. भारत बदलायचा असेल, तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल घडवावा लागेल. त्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर त्यांना दृष्टिकोन द्यावा लागेल, त्यांना विचारप्रवण बनवावे लागेल. हाच स्पर्धेचा हेतू आहे.
- प्रदीप लोखंडे, संस्थापक, ग्यान की

आपल्यातील हुशारी जोपासलीच पाहिजे. त्यासाठी कष्टदेखील करा. पण आधी शिक्षण पूर्ण करा. नंतरच छंद जोपासा. त्यात काही करता आले नाही, तर तुम्ही घेतलेले शिक्षण तुम्हाला मदत करील.
- मिलिंद गुणाजी, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com