पीएमपीएमएल बस खरेदीसाठी देणार 160 कोटी रुपये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

 

"पीएमपीएमएल'साठी फायनान्स मेकॅनिझम पद्धतीने बस खरेदीपोटी महापालिकेला आर्थिक दायित्वाच्या 60:40 प्रमाणानुसार 40 टक्के इतका निधी द्यावा लागणार आहे. बस खरेदीसाठी आवश्‍यक रक्कम मिळावी, यासाठी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे

 

पिंपरी -  पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपीएमएल) आठशे बस खरेदी केल्या जाणार आहेत. संबंधित खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 40 टक्के हिस्सा रक्कम म्हणून 160 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी (ता. 16) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी आहे.

"पीएमपीएमएल'साठी फायनान्स मेकॅनिझम पद्धतीने बस खरेदीपोटी महापालिकेला आर्थिक दायित्वाच्या 60:40 प्रमाणानुसार 40 टक्के इतका निधी द्यावा लागणार आहे. बस खरेदीसाठी आवश्‍यक रक्कम मिळावी, यासाठी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. संबंधित बस निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील 28 कोटी रुपयांच्या तरतुदीशिवाय उर्वरित रक्कम आवश्‍यकतेनुसार त्यासाठी वर्गीकरणाने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मलनिस्सारण व्यवस्थेसाठी तरतूद
राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियानांतर्गत (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी 85 कोटी तरतूद ठेवली आहे. त्यातील कामामधून 10 कोटी रुपये कमी करून अमृत योजनेतंर्गत महापालिका हद्दीतील मलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करणे व प्रकल्प राबविण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील सभेसमोर मंजुरीसाठी आहे.

सिटी ट्रान्स्फॉर्मेशन ऑफिस
शहरात राबविण्यात येणारे विविध प्रकल्प, "जेएनएनयूआरएम' योजना, अमृत, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी अभियान, प्रधानमंत्री आवास योजना आदींसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थांची मदत घेतली जाणार आहे. 2017-18 च्या अर्थसंकल्पात सिटी ट्रान्स्फॉर्मेशन ऑफिस हे नवीन लेखाशिर्ष तयार केले जाणार आहे. त्यावर तीन वर्ष कालावधीसाठी 14 कोटी 31 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे.