यात्रे अलंकापुरी येती। ती आवडती विठ्ठला।।

यात्रे अलंकापुरी येती। ती आवडती विठ्ठला।।

आळंदी - ‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, तो सुखसोहळा काय सांगू...’ असे म्हणत कार्तिकी वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वैष्णवांची दाटी आज आळंदीत झाली. उद्या मंगळवारी (ता. १४) एकादशी असल्याने पहाटे माउलींच्या समाधीवर पवमानपूजा झाल्यानंतर माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याबाहेर पडणार आहे.

आळंदीत कार्तिक वद्य अष्टमीपासून माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरवात झाली. तेव्हापासून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होऊ लागले. शहरातील प्रदक्षिणा रस्त्याबरोबरच पालिका चौक, चाकण रस्ता, गोपाळपुरा, वडगाव रस्ता, पद्मावती रस्ता, देहू आळंदी रस्ता, नवीन पुलाकडील रस्ता वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेला. महाद्वार तसेच इंद्रायणीतीरावर अलोट गर्दी दिसून येत होती. पहाटेपासून वारकऱ्यांचा ओघ सुरू होता. ठिकठिकाणी ‘माउली माउली’चा गजर आणि टाळमृदंगाचा नाद ऐकू येत होता. दर्शनबारीत तीस तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने देउळवाड्याच्या पश्‍चिम दरवाजातील दर्शनमंडपातून भाविक आत प्रवेश करताच चोपदार फाउंडेशन आणि देवस्थानच्या वतीने प्रत्येकाला खिचडी, चहाचे मोफत वाटप करण्यात आले. राज्यभरातून कोकण, सोलापूर, खानदेश, मराठवाडा भागातून दिंड्यांचा ओघ सुरूच होता. पुणे जिल्ह्यातून छोट्या मोठ्या दिंड्यांचे आज दिवसभर आगमन होत होते. 

शहरातील प्रमुख रस्ते दिंड्यांनी फुलून गेले होते. राहुट्या आणि मंडपांतून भजन-कीर्तन सुरू होते. खासगी गाड्या तसेच एसटी महामंडळ, पीएमपीद्वारे वारकऱ्यांची पावले आळंदीच्या दिशेने पडत होती. दुपारनंतर भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढू लागल्याने कार्तिकी एकादशीला मोठी गर्दी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

 दरम्यान, उद्या मंगळवारी (ता.१४) एकादशी असल्याने माउलींच्या समाधीवर पवमानपूजा होणार आहे. आळंदीतील मंदिर परिसर, झाडी बाजार, चाकण रस्ता, देहूफाटा दुकानांमुळे सजला होता. ठिकठिकाणी प्रसादाची दुकाने थाटली होती. दरम्यान, वडिवळे धरणातून वारीसाठी इंद्रायणीत पाणी सोडल्याने भाविकांच्या स्नानाची सोय झाली. माउली मंदिराकडून शनी मंदिरमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर एकेरी मार्गाने भाविकांना सोडले जात होते. इंद्रायणीकडून येणाऱ्या भाविकांना शनी मंदिरामागील रस्त्यावरून भराव रस्त्यावर सोडले जात होते. मंदिरापुढे नारळ फोडण्यास पोलिसांनी बंदी केली आहे.

एकादशीचे मुख्य कार्यक्रम
मध्यरात्री ते पहाटे तीनपर्यंत - माउलींच्या समाधीवर पवमानपूजा आणि अभिषेक. सोबत अकरा ब्रह्मवृदांचा मंत्रघोष.
दुपारी बारा ते साडेबारा - महानैवेद्य.
दुपारी एक - माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर.
रात्री साडेआठ - पालखी मंदिरात आगमन व धुपारती.
रात्री बारा ते चार - मोझे यांच्या वतीने जागर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com