भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पिंपरी - जुने भांडण आणि आर्थिक देवाण-घेवाणीतून भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे आणि त्याच्या 20 साथीदारांनी दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल 11 दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना यमुनानगर पोलिस चौकीसमोर शनिवारी (ता. 30) घडली. 

पिंपरी - जुने भांडण आणि आर्थिक देवाण-घेवाणीतून भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे आणि त्याच्या 20 साथीदारांनी दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल 11 दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना यमुनानगर पोलिस चौकीसमोर शनिवारी (ता. 30) घडली. 

तुषार हिंगे, प्रदीप हिंगे, राहुल गवारे, रोहित गवारे, विशाल बाबर, शिवराम चिखले, हेमंत भोसले, अरविंद भोकरे, चंदन सिंग, गोविंद सातपुते, रवींद्र तळेकर, हृषिकेश तळेकर, दादा तळेकर, अभिषेक माने, अजिंक्‍य माने, आदिनाथ काळभोर, विश्‍वास साकोरे, बंटी साळुंखे, सुनील शेलार, किशोर दराडे अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश नारायण गारुळे (वय 48 रा. मोशी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गारुळे हे त्यांच्या मित्रासह यमुनानगर पोलिस चौकी येथे 20 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता आले असता तुषार हिंगे व त्याचे साथीदार गाडीतून आले व शिवीगाळ करत गारुळे यांच्यावर तलवारीने वार केले. हे वार चुकल्यानंतर त्यांनी गारुळेच्या डोक्‍याला पिस्तूल लावले. मात्र पिस्तुलाचा चाप न दबल्याने तेथील सिमेंटचा गट्टू त्यांच्या डोक्‍यात मारला; तसेच गारुळे यांच्या मित्रासही मारहाण केली. ही मारहाण पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगे व त्यांच्या साथीदारांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, संगनमत करणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे करीत आहेत. 

पोलिसांवर दबाव? 
नगरसेवक तुषार हिंगे हे पोलिसपुत्र आहेत; तसेच ते सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आहेत. हा प्रकार निगडी पोलिस ठाण्यासमोरच घडला. या घटनेत हिंगे याचे नाव वगळावे व घटनेचे ठिकाण बदलावे याकरिता गुन्हा दाखल होण्यास वेळ झाल्याची चर्चा राजकीय आणि पोलिस वर्तुळात सुरू आहे.