‘वॉलपेपर’द्वारे घराला ‘हटके लुक’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पिंपरी - दिवाळीच्या निमित्ताने पूर्वी घर रंगविण्यावर भर दिला जात होता. आज व्यग्र जीवनशैलीत रंगकामाऐवजी वॉलपेपरने घराला ‘हटके लुक’ देण्याचा ट्रेंड आला आहे. ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन बाजारात वॉलपेपरचे शेकडो प्रकार दाखल झाले आहेत. घराच्या सौंदर्याला चार चाँद लावणाऱ्या गृहसजावटीच्या अनेक वस्तूही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी  होत आहे.

पिंपरी - दिवाळीच्या निमित्ताने पूर्वी घर रंगविण्यावर भर दिला जात होता. आज व्यग्र जीवनशैलीत रंगकामाऐवजी वॉलपेपरने घराला ‘हटके लुक’ देण्याचा ट्रेंड आला आहे. ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन बाजारात वॉलपेपरचे शेकडो प्रकार दाखल झाले आहेत. घराच्या सौंदर्याला चार चाँद लावणाऱ्या गृहसजावटीच्या अनेक वस्तूही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी  होत आहे.

दिवाळी दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा सण. दिवाळीची खरी गंमत घर-जागा सुशोभित करण्यातच आहे, त्यासाठी मोठे घर किंवा स्वतःची स्वतंत्र खोलीच असली पाहिजे असे नाही. अगदी खोलीचा छोटा कोपरा मिळाला, तरी त्यातून तुम्हाला दिवाळीचा माहोल सहज उभा करता येतो. भिंतीचा लुक बदलण्यासाठी रंगकाम करण्याऐवजी वॉलपेपरद्वारे भिंतीची सजावट करण्यात येत आहे. बाजारात वेगवेगळ्या डिझाइनचे वॉलपेपर उपलब्ध आहेत. सोबतच भिंतीवर काही प्रमाणात नवी पेंटिंग करून वेगळा आणि चमकदार लुक देण्याकडे कल आहे. ‘कार्पेट’चा वापर करून घराच्या फरशीला वेगळा लुक देण्यात येत आहे. 

इनडोअर प्लांट्‌स
दिवाळीच्या काळात ड्रॉइंग रूममध्ये ‘प्लांट्‌स डेकोरेट’ केल्याने घराला एक वेगळाच लुक मिळतो. यासाठी काही वर्षांपासून ड्रॉइंग रूममधील सेंटर टेबलच्या मधोमध काचेच्या एका पसरट भांड्यात पाणी भरून त्यात सुगंधित फुलांच्या पाकळ्या सजावटीचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. रात्री त्यात फ्लोटिंग कॅंडल लावण्यासाठी मार्केटमध्ये कॅंडल विक्रीस आहेत. 

बेडरूम सजावट
बाजारपेठेत सणानिमित्त बेडरूमच्या भिंतीचा रंग आणि बेडशीटचा रंग यांचा मेळ घालणाऱ्या बेडशीटसह पिलोकव्हर सेटना प्रचंड मागणी आली आहे. दिवाणसेट बेडशीट, डबल बेडशीट, पायपस, चायनीज वेल्वेट, पॅचवर्क या प्रकारांची चलती आहे. ‘पॅचवर्क’ या बेडशीटला दिवाळीत मागणी आहे. घर सजावटीसाठी क्रिस्टल झुंबर दुकानात उपलब्ध आहेत. आकारानुसार झुंबर उपलब्ध आहेत. 

फर्निचरला करा री-अरेंज
घरातील फर्निचरमुळे घराला घरपण येत असते. पण, नवे फर्निचर खरेदी करण्यापेक्षा घराला नवा लुक देण्यासाठी फक्त वेगळ्या पद्धतीने ‘री-अरेंज’ करण्याची पद्धत रूढ होत आहे. त्यामुळे कमी वेळेत ड्रॉइंग रूमला वेगळेच नवेपण येते. तसेच, सोफ्याला नवीन कुशन कव्हर, पिलो कव्हर बदलून टाकल्याने घराचे सौंदर्य खुलेल. एखाद्या रिकाम्या भिंतीवर लाकडाच्या विचित्र आकारामुळे वॉल शेल्फची सजावट करण्याची फॅशन आली आहे. बाजारात आइस्क्रीमच्या काड्या, रंगीबेरंगी खडे, कागदापासून बनवलेल्या फुलांपासून डेकोरेटिव्ह हॅंगिग्सने सजावट करण्यात येत आहे.