घोषणा पुरे; आता कृती करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडी ही तशी जुनी समस्या. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यात गांभीर्याने लक्ष घातल्याने संबंधित सर्वच शासकीय यंत्रणा सरसावल्या. अनेक घोषणाही झाल्या; मात्र आता घोषणा बस्स, कृती करा.., अशी मागणी आयटीयन्ससह स्थानिकही करू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच पालकमंत्र्यांच्या उद्याच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, त्याच्या फलिताकडे समस्त हिंजवडीकरांचे लक्ष लागले आहे. 

पालकमंत्र्यांचा दौरा केवळ पाहणीपुरताच मर्यादित न राहता त्याला कृती व ठोस अंमलबजावणीची जोड दिली गेली पाहिजे, अशा भावना अनेकांनी ‘सकाळ’जवळ बोलून दाखविल्या. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी हिंजवडीचे ३० ते ३५ दौरे केले. या दौऱ्यादरम्यान  अनेक घोषणाही केल्या गेल्या. मात्र, त्या केवळ ‘भूलथापा’च ठरल्याबद्दल आयटीयन्सनी संतापही व्यक्त केला. सद्यःस्थितीत पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला पाहिजे, यावरही अनेकांनी प्रकाश टाकला.

वाहतूक पोलिसांची व्यथा
हिंजवडी उड्डाण पूल ते टप्पा तीनपर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत अरुंद आहे. गर्दीच्या वेळी या रस्त्यावर एखादे वाहन बंद पडले, तरी शंभर मीटरवर असलेला वाहतूक पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचेपर्यंत वाहनांची रांग एक किलोमीटरपर्यंत जाते. ही कोंडी फोडण्यात अर्धा ते एक तास जातो. अशी परिस्थिती जवळपास दररोज निर्माण होत असल्याचे पोलिस सांगतात.

‘मेट्रो झिप’चे दुखणे
‘मेट्रो झिप’सारखी विकसित केलेली पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आयटी कर्मचाऱ्यांसाठी दुखणे ठरली आहे. आडव्यातिडव्या स्वरूपात रस्त्यालगत उभ्या केलेल्या या सव्वाशे-दीडशे बसेसमुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या बसेससाठी स्वतंत्र भूखंड देण्यात यावा, अशी एमआयडीसीकडे मागणी होत आहे.

सध्या चर्चेत असलेल्या सहा किलोमीटरच्या म्हाळुंगे-माण रस्त्याचे नऊशे मीटरचे (१३० कोटी खर्च) काम पूर्ण झाले आहे. याच रस्त्यातील मुळा नदीवरील पुलाचे कामही ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित जागा ताब्यात आल्यानंतर त्वरेने हे काम पूर्ण करण्यात येईल.
- सुधीर नागे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

Web Title: pimpri news hinjewadi traffic