हिमशिखरांवर पराक्रम गाजवून कारगिल विजय 

हिमशिखरांवर पराक्रम गाजवून कारगिल विजय 

पिंपरी - ‘‘कारगिल हे इतिहासातील सर्वांत जास्त उंचीवर लढविले गेलेले युद्ध आहे. त्याचे भारतीय इतिहासातील सर्वांत अवघड युद्ध, असे वर्णन करावे लागले. भारतीय सैनिकांनी हिमशिखरांवर पराक्रम गाजवून कारगिल युद्धात विजय मिळविला,’’ अशा गौरवी शब्दांत लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) जयवंतराव चितळे यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी जागवल्या. निमित्त होते १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्या स्मरणार्थ बुधवारी (ता. २६) चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सह्याद्री प्रतिष्ठान, पुणे फार्मासिस्ट वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शौर्या तुला वंदितो’ या कार्यक्रमाचे.

अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. एम. पाटील होते. महापौर नितीन काळजे, ब्रिगेडियर मधुकर प्रचंड, वीरचक्र विजेते कर्नल गौतम खोत, कर्नल जगजित सिंग, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पुणे फार्मासिस्टचे अध्यक्ष राहुल वाडगाये, लायन ओमप्रकाश पेठे  उपस्थित होते.

कर्नल चितळे म्हणाले, ‘‘पाकिस्तानातील एक छोटे गाव नष्ट करण्याचे आदेश भारतीय सैनिकांना मिळाल्याने ते खड्या कड्यावर बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावात चढायला लागले होते. पाकिस्तानी उंचीवर चढून दबा धरून बसले होते. पाकिस्तानी लष्करातील सैनिक तोफखान्यातून गोळ्यांचा वर्षाव करत होते. या तोफखान्यासमोर भारतीय जवानांनी शौर्य दाखवून कारगिल युद्धात विजय मिळविला. भारताने या युद्धाची परिस्थिती ज्या संयमाने हाताळली त्याबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले.’’

लालन पाटील, सोमनाथ शेळके, सीएफएन रवींद्र धुमाळ, नायक अशोक कोरटकर, नायक सुभेदार बाबासाहेब तरडे, नायक सुभेदार प्रल्हाद जगताप, हवालदार विलास पाटील, कॅप्टन अशोकराव काशीद, कॅप्टन वामनराव वाडेकर, कॅप्टन जयराम चिकणे आदींना ‘शौर्य सन्मान’ देऊन गौरविले. वीर पत्नी निशा चंद्रकांत गलांडे आणि सोनाली सौरभ फराटे यांचा सन्मान केला. लेफ्टनंट जनरल पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रताप भोसले यांनी आभार मानले. 

वीर जवान रथ रॅली
कमांडो स्पेशल फोर्सचे कमांडो जयपाल दराडे यांच्या नियंत्रणाखाली खडकी ते चापेकर चौक, पिंपरी-काळेवाडी फाटा ते चिंचवडगाव मार्गे वीर जवान रथ रॅली काढण्यात आली. या रथामागे सायकलस्वार, बुलेटस्वार आणि जिप्सी यांनी सहभाग घेतला.

‘वीर पत्नींना  सरकारी नोकरी द्या’
हुतात्मा जवानांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न शासनाने सोडविला पाहिजे. वीर पत्नीला अनुकंपातत्त्वावर नोकरीसाठी शासकीयस्तरावर प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत, असे आवाहन वीर पत्नी सोनाली फराटे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com