'मोशी प्रदर्शन केंद्राचा स्वतंत्र अहवाल करा'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पिंपरी - ""मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी सल्लागाराची नियुक्ती करून स्वतंत्र व विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा,'' अशी सूचना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला केली. प्रदर्शनाच्या जागेला केवळ संरक्षक भिंत उभारल्याने हे केंद्र पूर्ण क्षमतेने उभारणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पिंपरी - ""मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी सल्लागाराची नियुक्ती करून स्वतंत्र व विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा,'' अशी सूचना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला केली. प्रदर्शनाच्या जागेला केवळ संरक्षक भिंत उभारल्याने हे केंद्र पूर्ण क्षमतेने उभारणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या 11 हेक्‍टर जागेचे सपाटीकरण करून या जागेभोवती संरक्षण भिंत उभारण्यासाठी साडेनऊ कोटी रुपयांच्या कामाला प्राधिकरणाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच एक हजार घरे बांधण्याचा प्रस्तावही प्राधिकरणाने तत्त्वतः मान्य केला. त्या पार्श्‍वभूमीवर आढळराव-पाटील यांनी निगडी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत या भागातील प्रलंबित प्रश्‍नांबाबत आज चर्चा केली. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या सुलभा उबाळे, नीलेश मुटके आदी उपस्थित होते. 

आढळराव म्हणाले, ""तीन वर्षांपूर्वी या संरक्षक भिंतीबाबत निविदा प्रसिद्ध केली होती. त्या वेळी एकच निविदा आली होती. त्यामुळे ते काम सुरू झाले नाही. आता पुन्हा या कामांची निविदा काढण्यात येत आहे. मात्र, केवळ संरक्षक भिंत उभारण्याने त्या केंद्राचे काम सुरू होणार नाही. भारतातील सर्वांत मोठे प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. यापूर्वी एका विदेशी कंपनीने या बाबतचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. तेथे पाच सहा पंचतारांकित हॉटेल, रेल्वे स्थानक उभारण्याचे त्यांनी सुचविले होते. मात्र, पुढे त्याचे काही झाले नाही.'' 

""हे प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी गेले चार-पाच वर्षे मी प्रयत्न करीत आहे. या केंद्राची उभारणी कशी करावी, या साठी पुन्हा एकदा सविस्तर प्रकल्प अहवाल केला पाहिजे. मुख्य उद्देश हा चांगल्या दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभारणे हा असला पाहिजे. केंद्र सरकारकडून त्यासाठी निधी मिळविता येईल. त्यासंदर्भात मी आज प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली,'' असे आढळराव यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""सेक्‍टर बारा येथे घरे बांधण्याबाबत पूर्वी बलवा यांच्या कंपनीला काम दिले होते. त्याविरुद्ध मी न्यायालयात गेलो होतो. ते काम बंद केले. तेथे आता नवीन प्रकल्प करण्याचा प्राधिकरणाचा प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावासह गेल्या सहा महिन्यांत प्राधिकरणाच्या झालेल्या बैठका, सुरू केलेली कामे यांची टिप्पणी देण्यास खडके यांना सांगितले आहे.'' 

"नाशिक महामार्गाचे लवकरच सहापदरीकरण' 
"पुणे-नाशिक महामार्ग सहा पदरी करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मी 27 ऑगस्टला चर्चा केली. तीन महिन्यात हे काम सुरू करण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले आहे, असे खासदार आढळराव यांनी सांगितले. हा रस्ता राजगुरुनगरपर्यंत सहा लेनचा केला जाईल. त्यात सुमारे तीन किलोमीटरचा उड्डाण पूल प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.