निळूभाऊ फुले चित्रपट महोत्सव उद्यापासून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पिंपरी - महापालिकेतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने १३ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान निळूभाऊ फुले चित्रपट महोत्सव होणार आहे. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात हा महोत्सव होईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पिंपरी - महापालिकेतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने १३ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान निळूभाऊ फुले चित्रपट महोत्सव होणार आहे. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात हा महोत्सव होईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

महोत्सवात ‘एक गाव बारा भानगडी’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’, ‘पिंजरा’ आदी चित्रपट तसेच विविध नाटकांचे प्रयोग दाखविले जाणार आहेत. त्याशिवाय महोत्सवात निळूभाऊ फुले यांच्या आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता होईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, उल्हास पवार, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, सुहासिनी देशपांडे, लीला गांधी आदी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंडित उपेंद्र भट यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत. त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर काळजे यांनी केले.

महोत्सवातील कार्यक्रमांची रूपरेषा 
शुक्रवार (ता. १३) : दुपारी २ - ‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपट, सायंकाळी ५ : महोत्सवाचे उद्‌घाटन, रंग एकपात्रीचे/नाटकांचे प्रवेश (सहभाग : वंदन नगरकर, दीपक रेगे, योगेश सुपेकर, दिलीप हल्याळ, भावना प्रसादे).

शनिवार (ता. १४) : सकाळी ११ - ‘सामना’ चित्रपट. दुपारी २ - ‘सिंहासन’ चित्रपट. सायंकाळी ५:३० - ‘आठवणी निळूभाऊंच्या’ कार्यक्रम (सहभाग - ज्योती सुभाष, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे, विलास रकटे, चेतन दळवी, सूत्रसंचालन : राज काझी), रात्री ८:३० - देव कलेश्‍वर दशावतार नाट्य मंडळातर्फे (नेरुर, कुडाळ) ‘दशावतार’चे सादरीकरण. 

रविवार (ता. १५) : सकाळी ११ - ‘पिंजरा’ चित्रपट, ‘सखाराम बाइंडर’ नाटकातील निवडक दृश्‍ये असलेल्या २० मिनिटांच्या चित्रफीतीचे सादरीकरण. दुपारी २ - ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ चित्रपट. सायंकाळी ५ - महोत्सवाचा समारोप, प्रमुख उपस्थिती : राजदत्त, सुषमा शिरोमणी, ज्योती चांदेकर, भारती गोसावी, जयमाला इनामदार, सिंधू काटे, सोमनाथ शेलार, अंजली पटवर्धन, राघवेंद्र कडकोळ, वसंत अवसरीकर आदी. रात्री ९ - ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम.