महापौरांना फोन आला अन्‌ विषय मंजूर झाला 

महापौरांना फोन आला अन्‌ विषय मंजूर झाला 

पिंपरी - चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने नगरसेवकांना प्रभागात फिरण्यासाठी रिंगरोड तयार करावा, त्या रिंगरोडच्या टोलनाक्‍यावरील उत्पन्न नगरसेवकांना द्यावे, असा ठराव अभिरूप सभेत मंजुरीसाठी आला. यावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. महापौरांची भूमिका करणाऱ्या श्रावण हर्डीकर यांना एक फोन आला आणि या विषयाला मंजुरी मिळाली. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. 11) झालेल्या अभिरूप सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांची, तर अधिकाऱ्यांनी नगरसेवकांची भूमिका बजावल्याने एकाच धमाल उडाली. 

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिरूप सभेत महापालिकेचे अधिकारी नगरसेवकांच्या, तर नगरसेवक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत होते. वर्षभर महापालिकेच्या कामकाजात कोणी कशी भूमिका करते याची हुबेहूब नक्‍कल अधिकारी आणि नगरसेवकांनी केली. महापौर नितीन काळजे आणि आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या भूमिकेची अदलाबदल केली होती. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनीही अशाच प्रकारे भूमिकेची अदलाबदल केली होती. अभिरूप सभेची सुरवात "वंदे मातरम्‌'ऐवजी "या रावजी-बसा भावजी' या गाण्याने झाली. 

अर्धवट प्रस्तावाची परंपरा 
अधिकाऱ्यांच्या टेबलवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव सभेत होता. नगरसचिव उल्हास जगताप यांनी अर्धवट प्रस्ताव वाचला. त्यावर आयुक्‍तांनी पूर्ण प्रस्ताव वाचा, असे सांगितले. मात्र अर्धवट प्रस्ताव वाचण्याची येथील परंपरा असल्याचे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. भांडारपालांनी याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी नगरसेवकरूपी अधिकाऱ्यांनी केली. त्यावर भांडार विभागाचे प्रमुख बनलेले नगरसेवक शीतल शिंदे यांनी सहायक आयुक्‍त प्रवीण अष्टीकर यांची हुबेहूब नक्‍कल केली. सीसीटीव्हीसोबत अधिकाऱ्यांमध्ये चिप बसविल्याने ते कुठे जातात हे कळेल, असे उत्तर दिल्याने सभागृहात खसखस पिकली. 

फिरण्यासाठी रिंगरोड 
प्रभागात फिरण्यासाठी नगरसेवकांना रिंगरोड करावा, या प्रस्तावाला टोलनाका बसवून त्याचे उत्पन्न नगरसेवकांना द्यावे, अशी उपसूचना आली. त्यावर खुलासा करताना मुख्यलेखापाल राजेश लांडे यांची भूमिका करणाऱ्या सीमा सावळे यांनी जीआर प्रमाणेच काम करणार, असे विदर्भातील भाषेत उत्तर देत सर्वांची दाद मिळविली. 

माझ्या कानात खुलासा 
नगरसेवकांच्या परदेश दौऱ्याचा विषय मंजूर झाला. त्यावर चर्चेची मागणी करणाऱ्यांना, "विषय मंजूर झाल्यावरही चर्चा करण्याची येथील परंपरा आहे,' असे सांगत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. या विषयाबाबत खुलासा करण्याची मागणी झाली. त्यावर, त्यांनी माझ्या कानात खुलासा केला आहे,' असे आयुक्‍तांनी सांगितल्यावर सर्वांनाच हसू आवरले नाही. 

नातेवाइकांना आरक्षण 
पंतप्रधान आवास योजनेतून अधिकारी- पदाधिकारी यांच्या नातेवाइकांना 25 टक्‍के सदनिका आरक्षित करण्याचा विषय मंजुरीसाठी होता. त्यावर बोलताना नगरसेवक बनलेल्या उल्हास जगताप यांनी निवडणुकीत खर्च झाल्याने घर गहाण पडल्याचे सांगितले. यामुळे 25 टक्‍क्‍यांऐवजी 100 टक्‍के आरक्षण देण्याची मागणी केली. 

पाणी मुरू देऊ नका 
पुरेसा पाऊस पडूनही पाणीपुरवठा विस्कळित असल्याने नेमके पाणी मुरते कुठे? याबाबतचा प्रश्‍न चर्चेसाठी होता. त्यावर नगरसेवक बसलेले समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी पाणी टंचाईमुळे शहरात पाण्याचे एटीएम सुरू करावेत, अशी मागणी केली. मात्र कुठेच पाणी मुरू देऊ नका, असे सांगत महापौर बनलेल्या हर्डीकर यांनी या विषयाला मंजुरी दिली. 

जलवाहतुकीसह पाणबुडी 
रावेत ते पुणे मनपा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव सभेसमोर मंजुरीसाठी होता. नगरसेवक बनलेल्या सहायक आयुक्‍त योगेश कडुसकर यांनी जलवाहतुकीसोबत पाणबुडीही खरेदी करण्याची उपसूचना दिली. कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी नदी प्रदूषित असताना जलवाहतूक नको, असे सांगत प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण विभाग करतोय तरी काय, असा सवाल उपस्थित केला. 

तोडफोड अन्‌ फाडाफाडी 
नगरसेवक बनलेल्या काही अधिकाऱ्यांनी महापौरांसमोर येऊन गोंधळ घातला. तोडफोड करण्यासाठी कुंडी उचलली. कागदे फाडून टाकली. मग महापौर बनलेल्या हर्डीकर यांनी त्या नगरसेवकांना एक तासाकरिता निलंबित केले. 

ब्यूटिशियन ठेवावी 
बायोमेट्रिक हजेरीसाठी प्रवेशद्वाराजवळ आरसे बसविण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी होता. त्यावर प्रवीण तुपे यांनी आरशांसोबत ब्यूटिशियन ठेवावी, अशी उपसूचना दिली. 

चौकात भेटा मग दाखवतो 
समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी "चौकात भेटा मग दाखवतो,' अशी बातमी वाचल्याचे सांगत, "काय दाखवायचे ते येथेच दाखवा,' असे सांगितल्याने एकच हशा पिकला. मात्र हा वादग्रस्त विषय असल्याचे सांगत सभागृहाच्या कामकाजातून तो वगळण्यात यावा, असे आदेश महापौर हर्डीकर यांनी दिल्यामुळे पुन्हा एकदा हशा पिकला. 

झिंगाटने समारोप 
सभेनंतर राष्ट्रगीत ऐवजी सैराटमधील झिंग-झिंग झिंगाट गाण्याने समारोप करीत पुढील वर्षापर्यंत ही सभा तहकूब करण्यात आल्याचे महापौर हर्डीकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com