आयुष्याच्या सायंकाळी स्वाभिमान सांभाळी...

आयुष्याच्या सायंकाळी स्वाभिमान सांभाळी...

पिंपरी - एस. एन. रेणावीकर, वय ८०. केंद्र सरकारच्या नॅशनल सेव्हिंग ऑर्गनायझेशनचे निवृत्त अधिकारी. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर २२ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. मात्र, आजही ते मोठ्या ताठ मानेनं जगताहेत. मुलांची आर्थिक सुबत्ता असतानाही ते अद्याप आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. नव्हे तर शहरातील एका सुप्रतिष्ठित वृद्धाश्रमात ते स्वेच्छेने आपले आयुष्य मोठ्या आनंदानं व्यथित करताहेत. वृद्धाश्रमाच्या शुल्काचा भारही त्यांनी मुलांवर टाकलेला नाही. आर्थिक स्वावलंबित्वाचा हक्क बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे आभार मानताना ते जराही थकत नाहीत. किंबहुना, रेणावीकर यांच्याप्रमाणेच भारतातील तमाम ज्येष्ठांचे निवृत्तीनंतरचे जीवन केवळ निवृत्ती वेतनामुळं सुसह्य झालं आहे.

रविवारी (ता. १७) भारतात सर्वत्र साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘पेन्शनर्स डे’निमित्त रेणावीकर यांनी ‘सकाळ’जवळ मनोगत व्यक्त केलं. ‘पेन्शन ही भीक नाही, तर तो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे,’ असा निवाडा चंद्रचूड यांनी १७ डिसेंबर १९८२ मध्ये दिला. तेव्हापासून देशभरात हा दिवस ‘पेन्शनर्स डे’ म्हणून साजरा होतो. सरकारी, निमसरकारी तसेच काही खासगी कंपन्यांकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती दिली जाते. अर्थात, या निवृत्ती वेतनाच्या वितरणात काही त्रुटी असतीलही; परंतु आज देशांतील कोट्यवधी ज्येष्ठांचं मावळतीला आलेलं आयुष्य या निवृत्ती वेतनानं सर्वार्थानं सुसह्य केलंय. ‘पेन्शनर्स डे’निमित्त रेणावीकर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठांनी (पेन्शनर्स) चंद्रचूड यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘मधुरभाव’ वृद्धाश्रमात या निवृत्ती वेतनाची गरजही अनुभवण्यास मिळाली. 

पेलू शकलो पत्नीचे आजारपण
गोविंदराव पाटील यांची कथाही थोड्याफार फरकानं तशीच. ३३ वर्षांच्या सेवेनंतर १९८८ मध्ये ते पश्‍चिम रेल्वेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात जात असतानाच पत्नीचा डावा डोळा शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. आठ वर्षांनंतर उजव्या डोळ्याचीही दृष्टी गेली. आयुष्याच्या मावळतीला आलेल्या अंधत्वाच्या धक्‍क्‍याने त्या सैरभैर झाल्या. हळूहळू स्मरणशक्ती नाहीशी झाली. व्यवधानंही गमावली. त्यानंतर शारीरिक अडचणी सुरू झाल्या. मुले-सुना नोकरदार असल्याने पत्नीचा सर्व भार पाटील यांच्यावर येऊ लागला. वयानुसार, हा भार पेलणे अवघड जाऊ लागले. अन्‌ अखेर त्यांनी वृद्धाश्रमाचा पर्याय निवडला. दुर्दैवाने काही दिवसांपूर्वीच सौ. पाटील यांचं निधन झालं. मात्र, पेन्शनच्या बळावर मी पत्नीचं आजारपण पेलू शकलो, तसेच तिला चांगल्या वृद्धाश्रमात ठेवू शकलो, अशी भावना पाटील यांनी बोलून दाखविली.

जगण झाले सुसह्य
आरोग्य खात्यातील निवृत्त अधिकारी (९३ वर्षीय) लीला जोशी यादेखील आपलं एकाकी आयुष्य केवळ अन्‌ केवळ निवृत्तीवेतनामुळे ताठ मानेनं जगत आहेत. आपलं निवृत्तिवेतन त्या वृद्धाश्रमाकडे सुपूर्त करतात. मात्र, त्यातून किमान आमचं जगणं सुसह्य झालंय असे त्या सांगतात. एवढेच नाही, तर आमच्यासारख्या पेन्शनर्ससाठी हे निवृत्तिवेतन संजीवनी ठरलं आहे, असं त्या आवर्जून नमूद करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com