रस्ते कामातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा गाजला

Pimpri-Chinchwad-Municipal
Pimpri-Chinchwad-Municipal

पिंपरी - रस्त्याच्या ४२५ कोटी रुपयांच्या कामातील कथित भ्रष्टाचाराला विरोधकांना महापालिकेत वाचा फोडताच आली नाही तर ‘यात भ्रष्टाचार झालाच नाही,’ असे ठामपणे सांगत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी विरोधकांना पुरावे देण्याचे आव्हान दिले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील अनेक प्रकरणे पुराव्यांसह मांडत विरोधकांवरच हल्ला चढविला.  

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून या विषयावर सर्वसाधारण सभेत आक्रमक मांडणी होईल, अशी चर्चा होती; मात्र सोमवारी सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या तीन-चार नगरसेवकांनी अन्य विषयांवर बोलताना या विषयाचा उल्लेख केला. भाजप मात्र विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याच्या पूर्ण तयारीनिशी आल्याचे, त्यासाठी त्यांनी शिस्तबद्ध आखणी केल्याचे दिसून आले. भाजपच्या नवीन नगरसेविकांनीही पक्षाची बाजू पोटतिडकीने मांडत या रस्त्यांच्या कामाला पाठिंबा दिला. सुरवातीला दत्ता साने यांनी या रस्त्याच्या जागा ताब्यात नसल्याचा उल्लेख केला; मात्र चऱ्होलीतील सातही रस्त्याच्या जागा ताब्यात आल्याचा खुलासा महापौर नितीन काळजे यांनी केला. कलाटे म्हणाले, ‘‘कामाला आमचा विरोध नाही; मात्र ठेकेदारांनी केलेल्या रिंगला आमचा विरोध आहे.’’

तर सीमा सावळे यांनी, रस्त्याचे नाव आणि निविदांच्या रकमा सांगत त्यांची बाजू खंबीरपणे मांडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते, ते नेते स्थायी समितीवर असताना महापालिकेत ५० ते ६० टक्के जादा दराने आलेल्या निविदा कशा मंजूर करण्यात आला, त्याची माहिती पुराव्यासह देत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना त्यांनी पूर्वीच्या दहा वर्षांच्या काळात शिवसेनेच्या नगरसेविका असताना कशी वाचा फोडली, त्याचे कथन सावळे यांनी केले. कारवाई आणि कार्यवाही या शब्दांत फरक असून, मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचे सावळे यांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी आमच्याच बाजूचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविला असल्याचेही त्यांनी सांगितले. सुमारे तासभर त्या बोलत होत्या.  भाजपच्या सुवर्णा बुरडे, सारिका बोराडे, सोनाली गव्हाणे, केशव घोळवे, राहुल जाधर यांनीही समाविष्ट गावांच्या रस्ते करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. सभागृह नेते एकनाथ पवार यांनीही विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.

रिंग रिंग रिंगा ...
रिंग रिंग रिंगा...गाण्याचा उल्लेख करत सीमा सावळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘‘रिंग केली या टीकेला गेले महिनाभर तोंड देत आहोत. रिंग झाली असेल, तर उघड करा. रिंगा केल्या तुम्ही. भ्रष्टाचार केला तुम्ही. अनधिकृत बांधकामे तुमच्या काळात झाली. शास्तीकर लादला तुम्ही आणि भोगायचे आम्ही. तुमच्या हातात आता रिंगा घालायला देते.’’

कमी दरांच्या निविदांसाठी काय प्रयत्न केले - बहल
विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘ठेकेदारांनी निविदा दाखल करताना रिंग केली होती. पूर्वी कामे करताना या ठेकेदारांनी १८ ते २० टक्के कमी दरांनी कामे केली. आता मात्र त्या ठेकेदारांनी निविदा रकमा कमी केल्या नाहीत. त्यासाठी प्रशासनानेही प्रयत्न केले नाहीत. शिवसेनेचे राहुल कलाटे यांनीही उघडकीला आणलेल्या प्रकरणातही ठेकेदारांनी कमी रकमेची निविदा भरल्याचे दिसून आले.’’

गावांच्या विकासासाठीच रस्ते - सावळे
सावळे म्हणाल्या, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना वीस वर्षे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा विकास झाला नाही. तेथील विकास आराखडा विकसित केल्यास तेथे विकास होईल. समाविष्ट गावांना निधी दिला, तर गेले महिनाभर आम्ही टीकेला तोंड देत आहोत. भ्रष्टाचार झाला असे म्हणत असाल, तर पुरावे द्या. मी जाहीर आव्हान देते, की एका व्यासपीठावर आपण समोरासमोर मुद्दे मांडू. एकही रस्त्याची निविदा ही स्वीकृत दरापेक्षा जादा रकमेची नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com