शहरातील तलाव ‘हाउसफुल’

संभाजीनगर - कडक उन्हामुळे जलतरण तलावावर वाढलेली गर्दी.
संभाजीनगर - कडक उन्हामुळे जलतरण तलावावर वाढलेली गर्दी.

पिंपरी - कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने आणि बहुतेक सर्व परीक्षा संपल्याने शहरातील जलतरण तलाव ‘हाउसफुल’ होऊ लागले आहेत. देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असलेले तीन तलाव वगळता उर्वरित तलावांवर क्षमतेपेक्षा जास्त नागरिक पोहायला सोडण्याची वेळ क्रीडा प्रशासनावर आली आहे.

शहरातील सर्वांत जुना आणि मोठा जलतरण तलाव म्हणून नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलाव ओळखला जातो. त्याची एका वेळेला २०० व्यक्ती पोहण्याची क्षमता आहे. त्यानुसार सध्या दुपारच्या वेळेस २०० व्यक्तींना पोहायला सोडले जात आहे. चार जीवरक्षक आणि दोन मदतनीस नेमण्यात आले आहेत. 

पालिकेच्या क्रीडा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव, कासारवाडी, यमुनानगर, संभाजीनगर येथील तलाव ‘हाउसफुल’ होत असून, मे महिना अखेरीपर्यंत तलावावरील गर्दी कायम राहण्याची अपेक्षा आहे. मगर तलाव वगळता बहुतेक तलावांची क्षमता एका वेळेस सरासरी १०० व्यक्ती इतकी आहे. मात्र, सकाळी आठ वाजता आणि दुपारी विशेषतः ३.३० ते ४.३० च्या बॅचला गर्दी वाढत असल्याने त्यावेळेत १२५ ते १५० व्यक्तींना एकाच वेळेस पोहायला सोडावे लागत आहे.  

मोहननगर येथील राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाची किरकोळ स्थापत्यविषयक कामे बाकी आहेत. तलावात पाणीही भरण्यात आले आहे. ८ ते १० दिवसांत तो सुरू होणे अपेक्षित आहे. चिंचवडगाव येथील कै. वस्ताद विठोबा गावडे तलावाचीही स्थापत्यविषयक कामे चालू आहेत. तेथेही पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, तलाव नागरिकांसाठी खुला होण्यास वेळ लागणार आहे. निगडी येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावातून खालील दुकानांमध्ये पाणी गळती होत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर तलाव सुरू केला जाणार आहे. 

बहुतेक तलावांवर जुने विद्युत पंप
शहरातील बहुतेक सर्व तलावावरील जलशुद्धीकरणासाठी वापरले जाणारे विद्युत पंप हे जुने झाले आहेत. काही ठिकाणी पाच ते दहा वर्षांपर्यंत त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे, पंप बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.

नागरिकांची हुल्लडबाजी 
बहुतेक तलावांवर नागरिकांची गर्दी होत आहे. काही नागरिक विशेषतः मुले आणि युवक पोहायला मिळावे यासाठी हुल्लडबाजी करत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com