दस का दम

दस का दम

रवींद्र जगधने 
पिंपर - रिझर्व्ह बॅंकेने खुलासा करूनही दैनंदिन व्यवहारातून दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवेने पिंपरी- चिंचवड, मावळ तालुक्‍यातील अनेकांनी दहा रुपयांची नाणी स्वीकारणे बंद केले आहे. खिशात दहा रुपयांचे चलनी नाणे असूनही ते व्यवहारात घेतले जात नसल्याने अनेकांची तारांबळ उडते. त्यामुळे सुट्या पैशांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत ‘सकाळ’ने पिंपरी मुख्य बाजार व शहराच्या विविध भागांत पाहणी केली असता अनेक ठिकाणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारणे काहींनी बंद केल्याचे वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे त्याला काही सरकारी कार्यालयेही अपवाद राहिलेली नाहीत. 

येथे नाकारतात नाणी
शगुन चौकात स्टेशनरी दुकान, पिंपरी मासे बाजार, रेल्वे वाहनस्थळ, भाजी मंडई वाहनस्थळ, रेल्वे स्टेशनवरील तिकीट मशिन ऑपरेटर, लालबहादूर शास्त्री मंडईतील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, पिंपरी कॉलनी टपाल कार्यालय, पिंपरी कॅम्प चहा विक्रेते, पान टपरी. 

येथे स्वीकारतात नाणी
फूल विक्रेते, रसवंतिगृहे, पिंपरी स्टेशन रिक्षा थांबा, बोंबील बाजार, मसाला मार्केट, शगुन ऑटो रिक्षा स्टॅंड, वडा-पाव स्टॉल.

नाणी टाळण्याची कारणे
 नाण्याचे वजन वाढविल्यामुळे टाळाटाळ
 सोशल मीडियावरील अफवेचा परिणाम
 बॅंकांमध्ये नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ
 जनजागृतीचा अभाव 

भाजी मंडईत जवळपास सर्व विक्रेते दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेली नाणी आम्ही स्वीकारत नाही. मात्र, रेल्वे प्रवाशांची नाणी स्वीकारतो. 
- बृजमोहन सैनी, पर्यवेक्षक, पिंपरी रेल्वे स्थानक

----------------------------------------------------------

देहूरोडमध्ये स्वयंघोषित बंदी
संदीप भेगडे
देहूरोड - येथील महात्मा फुले मंडईतील काही भाजीविक्रेत्यांचा अपवाद वगळता बहुतेक व्यावसायिक आणि व्यापारी दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. नाणे न स्वीकारणारे विक्रेते आणि ग्राहक यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दहा रुपयांचे नाणे बंद झालेले नसताना विक्रेते आणि ग्राहकांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीतच दहाच्या नाण्यांवर स्वयंघोषित बंदीचे वास्तव समोर आहे. 

रेल्वे तिकीट खिडकीवरही नकार
देहूरोड रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवरही दहाचे नाणे स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याची माहिती काही रेल्वे प्रवाशांनी दिली.

बॅंकांमध्येही तीच स्थिती
शहरातील व्यापारी वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकांमध्ये घेऊन जातात. मात्र, साठलेली नाणी एकदम घेण्यास बॅंकांही टाळाटाळ करतात. ही नाणी एकदम न भरता प्रत्येक महिन्याला थोडे, थोडे भरण्यास सांगत आहेत. कारण बॅंकेतही डॉलरचे मोठ मोठे ढीग साठू लागले आहेत.

ग्राहकांशी वाद नको म्हणून दहाची नाणी ग्राहकांकडून स्वीकारतो. आतापर्यंत पाच ते सहा हजार रुपयांची नाणी जमा झाली आहेत. ही नाणी घेण्यास ग्राहक मात्र साफ नकार देतात.
- संजय अगरवाल, व्यापारी

दहाच्या नाण्यांवर बंदी नाही, याची आम्हा व्यापाऱ्यांना कल्पना आहे. ग्राहक नाराज व्हायला नको, म्हणून नाणी स्वीकारतो.
- सुरेश अगरवाल, व्यापारी

----------------------------------------------------------

भोसरीत भांडणाचा खणखणाट
संजय बेंडे 

भोसरी : भोसरी परिसरात दहाच्या नाण्यांसह आकाराने मोठी जुनी पाचची नाणीही दुकानदार, छोटे विक्रेते, रिक्षाचालक स्वीकारत नसल्याने ग्राहकांची अडचण होत आहे. नाणी न स्वीकारण्यावरून वादावादीचे प्रकारही घडत आहेत. 

प्रसंग १
भोसरी : पाच रुपयांचे मोठे नाणे दुकानदाराने घेण्यास नकार दिल्याने खेडूत ग्राहकाची पंचाईत झाली. त्यांची गरज लक्षात घेऊन ‘सकाळ’ प्रतिनिधीने ते नाणे स्वीकारून नवीन पाचचे नाणे ग्राहकास दिले. याबद्दल दुकानदारास विचारले असता, ही नाणी बंद झाल्याचे त्यांनी सांगण्यात आले. ‘यास पुरावा काय’? यावर ते म्हणाले, ‘‘इतर ठिकाणी अशी नाणी घेतली जात नाहीत. म्हणून मी घेत नाही.’’ 

प्रसंग २ 
बोपखेल : दहा रुपयांचे नाणे न स्वीकारल्याच्या कारणावरून एका ग्राहकाचे दुकानदाराशी भांडण झाले. दोघांचे भांडण विकोपाला गेले. दोघेही पोलिस ठाण्यात जाण्याची भाषा करू लागले. प्रकरण हातघाईवर येऊ लागल्याचे पाहून काहींनी मध्यस्थी केली आणि हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले. दिघी, चऱ्होली परिसरातही अशीच स्थिती अनेकदा उद्‌भवते.

----------------------------------------------------------

खोटा सिक्का नाही
शिवाजी आतकरी 
निगडी -
 दहा रुपयांची नाणी अलिखितपणे चलनाबाहेर जाऊ लागली आहेत. व्यावसायिकांकडून याबाबत असहकार्य होत असल्याने दहाचे नाणे जणू खोटा सिक्का, असे बाजारात समीकरण निर्माण होऊ पाहातेय. व्यापारी वर्गाकडून दहाचे नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ किंवा नकार देण्याचे प्रमाण वाढले आहे. दहाची नाणी नाकारणे हा गुन्हा आहे. मात्र, ग्राहकांना याबाबत तक्रारीस योग्य जागा नाही. ही नाणी स्वीकारायची की नाही, हे सर्वस्वी व्यावसायिक ठरवित असल्याने ग्राहक कोंडीत सापडत आहेत. त्यामुळेच ही नाणी बंद झाल्याच्या अफवांना गती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com