सर्वांना मिळावा योगामृताचा अनुभव

सर्वांना मिळावा योगामृताचा अनुभव

योग म्हणजे काय? योगशास्त्राचे जीवनातील महत्त्व काय?
- योगाकडे योगासने आणि एक व्यायामप्रकार या दृष्टीने पाहिले जाते. अर्थात, तो एक व्यायामप्रकारही आहे; परंतु तो तेवढाच निश्‍चितच मर्यादित नाही. योग हे धर्मापलीकडील तत्त्वज्ञान आहे. गुरुजींनी म्हणजे बी. के. एस. अय्यंगार यांनी योग विषयाची सूत्रबद्ध मांडणी करत त्याची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवली. योग हे मोठे शास्त्र असून, ते तत्त्वावर अवलंबून आहे. त्यामुळे आपली जीवनपद्धती अधिकाधिक सुकर होण्यासाठी योगशास्त्राचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे. सर्वसामान्यांनी त्यांची जीवनपद्धती सुधारण्यासाठी योगशास्त्राचे तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे, यासाठी तसेच योगामृताचा अनुभव सर्वांना मिळावा, यासाठी गुरुजींनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे देश-विदेशांतील हजारो नागरिकांना योगामृताची प्रचिती आली आहे. 

बी. के. एस. अय्यंगार यांच्या जीवनप्रवासाबद्दल काय सांगाल?
- लहानपणी गुरुजी टीबीचे रुग्ण होते. कुटुंबातील गरिबीमुळे त्यांना औषधोपचार मिळणे शक्‍य नव्हते. म्हणून त्यांना आपल्या सुदृढ आरोग्यासाठी योगासने करण्याची जाणीव झाली. योगगुरू टी. कृष्णमाचार्य यांच्याकडून त्यांनी योगासने आणि योगशास्त्राचे धडे घेतले. गुरुजी अगदी पंधरा-सोळा वर्षांचे असल्यापासून योगासनांची प्रात्यक्षिके करत. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी नागरिकांना योगशास्त्राची माहिती देण्याचे ठरविले. सुरवातीला ते डेक्कन जिमखान्याला योगासने शिकवायचे. कालांतराने पीवायसी, फर्ग्युसन महाविद्यालय, भावे प्रशाला, रेणुका स्वरूप प्रशाला येथे त्यांनी योगासनांचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. पुण्यानंतर त्यांनी आपला प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू केला. तिथेही योगशास्त्राचा संदेश त्यांनी पोचविला. योगासनाच्या साहाय्याने त्यांचे अंग वळविण्याचा गुण पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटायचे. मुंबईनंतर मग देश-विदेशांत त्यांच्या योगशास्त्राची महती पोचली आणि अनेक लोक शिक्षण घेण्यासाठी येऊ लागले. आम्ही त्यांना घरी ‘अण्णा’ म्हणायचो. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. धारिष्ट्य आणि शोध लावण्याची वृत्ती त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो. 

निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास कसा महत्त्वाचा आहे?
- योगाभ्यासामुळे आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. प्राणायाम केल्यास रक्ताभिसरण नीट होते, रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, श्‍वसनाचे आजार, हाडांसंदर्भातील व्याधी, पचनक्रिया, शरीराशी संबंधित विविध समस्यांवर इतर औषधोपचाराप्रमाणेच योगशास्त्रही उपयुक्त ठरते. शारीरिक आणि मानसिक समाधान मिळविण्यासाठीही हे शास्त्र महत्त्वाचे आहे.

चंचल असणाऱ्या नव्या पिढीला योगशास्त्र कसे महत्त्वाचे ठरेल?
- योगशास्त्र हा विषय अय्यंगार यांनी अगदी सोप्या पद्धतीने नव्या पिढीसमोर मांडून ठेवला आहे. आजकाल तरुण पिढीला सगळ्या गोष्टी ‘इन्स्टंट’ मिळत आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट मिळविण्यासाठी कष्ट, धडपड करावी लागते, हेच मुळी आजच्या पिढीला माहीत नाही. ‘इन्स्टंट’ ही आपली संस्कृती नाही. जीवनातील शांतता, सहजता हे आपल्या संस्कृतीला अभिप्रेत आहे. आधुनिकतेचा स्वीकार करायलाच हवा; परंतु आपल्यातील सहजताही जपायला हवी. चंगळवाद आणि चंचलतेमुळे माणसांच्या शरीर आणि मनावरही दुष्परिणाम होत आहेत. अगदी कमी वयात विविध आजारांनी माणूस ग्रासला जात आहे. अशा परिस्थितीत मन आणि शरीरावरील ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने शिकणे अनिवार्य आहे. जीवनाचा मार्ग शांतीचा आहे, त्यामुळे अनावश्‍यक घोडदौड थांबवायला हवी.

नव्या पिढीसाठी योगशास्त्र कसे महत्त्वाचे ठरेल?
योगशास्त्र हा विषय अय्यंगार यांनी अगदी सोप्या पद्धतीने नव्या पिढीसमोर मांडून ठेवला आहे. आजकाल तरुण पिढीला सगळ्या गोष्टी ‘इन्स्टंट’ मिळत आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट मिळविण्यासाठी कष्ट, धडपड करावी लागते, हेच मुळी आजच्या पिढीला माहीत नाही. ‘इन्स्टंट’ ही आपली संस्कृती नाही. जीवनातील शांतता, सहजता हे आपल्या संस्कृतीला अभिप्रेत आहे. चंगळवाद आणि चंचलतेमुळे माणसांच्या शरीर आणि मनावरही दुष्परिणाम होत आहेत. अगदी कमी वयात विविध आजारांनी माणूस ग्रासला जात आहे. अशा परिस्थितीत मन आणि शरीरावरील ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने शिकणे अनिवार्य आहे. जीवनाचा मार्ग शांतीचा आहे, त्यामुळे अनावश्‍यक घोडदौड थांबवायला हवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com