पावणेपाच लाख मोफत पुस्तके

संतोष आटोळे
शुक्रवार, 9 जून 2017

जिल्हा परिषद शाळांमधून पहिल्याच दिवशी वितरण 

शिर्सुफळ - ‘सर्व शिक्षा अभियाना’अंतर्गत जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांतील पहिली ते आठवीच्या शाळांमधील ४ लाख ७५ हजार ५६० विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 

जिल्हा परिषद शाळांमधून पहिल्याच दिवशी वितरण 

शिर्सुफळ - ‘सर्व शिक्षा अभियाना’अंतर्गत जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांतील पहिली ते आठवीच्या शाळांमधील ४ लाख ७५ हजार ५६० विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 

जिल्हा कार्यालयातून तालुका स्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तेथून शाळास्तरावर पुस्तके वितरित करण्यात येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके देण्याचे नियोजन केले आहे. मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे यंदाचे हे शेवटचे वर्ष आहे. पुस्तकांची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, निर्धारित कालावधीत सर्व विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढणे शक्‍य होणार नाही, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षण विभागामार्फत नियोजन केले आहे.  

जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन करून शाळा सुरू होण्यास आणखी कालावधी शिल्लक असतानाच तालुकास्तरावर पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. तालुकास्तरावरून ती पुस्तके शाळास्तरावर घेऊन जाणे, ही मुख्याध्यापकांची सर्वस्वी जबाबदारी राहणार आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके देऊन त्यांचे शाळेत स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख व उपशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

तालुकानिहाय विद्यार्थी संख्या
आंबेगाव : २३५८५, खेड : ५०२१०, जुन्नर : ४०१३२, मावळ : ३७५३६, मुळशी : २०३०३, भोर : १६८२७, वेल्हे : ५३८९, शिरूर : ४८२०७, हवेली : ८३४६३, पुरंदर : २२००७, दौंड : ४२२३१, इंदापूर : ४१३६४, बारामती : ४४३०६.