घरोघरी माहेरवाशिनी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पिंपरी - श्रावण सरला की वेध लागतात ते गौरी- गणपतीच्या आगमनाचे. भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीची घरोघरी स्थापना केली जाते. गौरीच्या आगमनासाठी काठ-पदराच्या साड्या नेसलेल्या... पैंजण, राणीहार,  कर्णफुले, बाजूबंद, कंबरपट्टा, मुकुट अशी आभूषणे चढविलेल्या... अन्‌ केसांत फुलांची वेणी माळलेल्या गौरीची रेडिमेड मूर्ती बाजारात उपलब्ध असल्याने महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

पिंपरी - श्रावण सरला की वेध लागतात ते गौरी- गणपतीच्या आगमनाचे. भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीची घरोघरी स्थापना केली जाते. गौरीच्या आगमनासाठी काठ-पदराच्या साड्या नेसलेल्या... पैंजण, राणीहार,  कर्णफुले, बाजूबंद, कंबरपट्टा, मुकुट अशी आभूषणे चढविलेल्या... अन्‌ केसांत फुलांची वेणी माळलेल्या गौरीची रेडिमेड मूर्ती बाजारात उपलब्ध असल्याने महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

मंगळवारी येणाऱ्या गौरींच्या स्वागताच्या तयारीला घराघरांत वेग आला आहे. चिंचवडगाव, आकुर्डी गावठाण, पिंपरी कॅम्प, भोसरी गावठाण बाजारपेठांमध्ये रविवारी गौरींचे मुखवटे व स्टॅंड खरेदी करण्यासाठी गर्दी झाली. गौरींसाठी लागणाऱ्या दागिन्यांसह साड्यांची बाजारपेठही फुलून गेली आहे. मंगळवारी गौरी आवाहनाचा दिवस आहे, तर बुधवारी गौरीपूजन होणार आहे. गौरींच्या आगमनासाठी आता एकच दिवसाचा अवधी उरल्याने पूजा साहित्यासह फळांच्या खरेदीला वाढती मागणी लक्षात घेऊन आवक झाली आहे. गौरीपूजनासाठी वापरण्यात येणाऱ्या डहाळ्यांना मागणी वाढली आहे. 

गोल्डन दागिन्यांना पसंती
गौरीचा साजशृंगारही विशेष असतो. गौरीसाठी ‘इमिटेशन’ दागिन्यांची बाजारपेठही रविवारी गर्दीने भरून गेली. देवीचा मुकुट, कंबरपट्टा, गळ्यातील दागिने मोत्यांचा वापर करून बनविण्यात आले आहेत. यंदा मोत्यांपेक्षा ‘गोल्डन टच’ बनावट असलेल्या दागिन्यांना अधिक मागणी असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्या रेश्‍मा धारूरकर यांनी दिली. कोल्हापुरी साज, टिक, ठुशी, नथ अशा पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीसाठी सुहासिनींनी गर्दी केली आहे. यातही श्रीमंती हार, तोडे, लक्ष्मीहार अशा नावीन्यपूर्ण दागिन्यांची खरेदी अधिक होत आहे. या दागिन्यांची किंमत शंभर ते एक हजार रुपये जोडी आहे. 

गौरीची संपूर्ण मूर्ती 
गौरीचे मुखवटे व मूर्तीही बाजारात उपलब्ध आहेत. मुखवट्यांसह लाकडी व लोखंडी स्टॅंडच्या विविध डिझाइन्स आहेत. संपूर्ण गौरीच्या मूर्तीची किंमत दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे. गौरीची मांडणी करताना पायली, हात किंवा धड, मुखवटा असते. पायली तीन आकारांत उपलब्ध आहे. मोठ्या आकारातील पायली एक हजार रुपयांपर्यंत, मध्यम आकारातील ६०० ते एक हजार २०० रुपयांना, छोट्या आकारातील पायली ३०० ते ३५० रुपयांना उपलब्ध आहे. मुखवटे ७०० ते अडीच हजार रुपयांपर्यंत जोडी आहे. हात आठशे ते दीड हजार रुपयांना आहेत. या उत्सवावर महागाईची झळ दिसून येत आहे. वस्तूंच्या किमती १० टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. पीओपी मुखवट्यांपेक्षा मॅटफिनिशिंगच्या मुखवट्यांचे विशेष आकर्षण असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.