गणेश विसर्जनासाठी तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

शहरातील मंडळांकडून देखावे, फुलांनी सजावट; ढोल-ताशा पथकांचे खेळही रंगणार
पिंपरी - गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील गणेश मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. चिंचवड आणि पिंपरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मंडळांनी विविध देखावे, रथाला फुलांची आकर्षक सजावट, ढोल-ताशा पथकांचे खेळ आदी नियोजन केले आहे.

शहरातील मंडळांकडून देखावे, फुलांनी सजावट; ढोल-ताशा पथकांचे खेळही रंगणार
पिंपरी - गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील गणेश मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. चिंचवड आणि पिंपरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मंडळांनी विविध देखावे, रथाला फुलांची आकर्षक सजावट, ढोल-ताशा पथकांचे खेळ आदी नियोजन केले आहे.

नवतरुण मंडळ, चिंचवडगाव (मानाचा गणपती) - ‘श्रीं’ची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता निघेल. फायबर आणि पीओपीचा वापर करून मंडळाने गजरथ तयार केला आहे. स्वराज्य ढोल-ताशा पथकाचे खेळ होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश चिंचवडे यांनी दिली. 

गांधी पेठ तालीम मित्र मंडळ (चिंचवडगाव) - मंडळाने ‘श्रीं’च्या मिरवणुकीसाठी भक्तीरथ तयार केला आहे. त्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये पांडुरंगाची महती सांगितली आहे. चौदा बाय अठरा फुटी महाल केला आहे. रथाला फुलांची आकर्षक सजावट असणार आहे. सायंकाळी सात वाजता मिरवणूक निघेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी दिली. 

संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळ (चिंचवडगाव) - ‘श्रीं’च्या मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी शाळेतील शंभर विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा पथक, शिवतांडव ढोल-ताशा पथक यांचे खेळ होतील. रथाला कृत्रिम फुलांची सजावट असणार आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मिरवणुकीस सुरवात होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष महेश मिरजकर यांनी दिली.

तरुण मित्र मंडळ (आकुर्डी) - ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीला सायंकाळी सहाच्या सुमारास सुरवात होईल. रथावर काल्पनिक महाल असणार आहे. मावळातील ढोल-ताशा पथकाचे खेळ होतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांनी दिली.

लालबहादूर शास्त्री व्यापारी संघटना (पिंपरी) - ‘श्रीं’ची मिरवणूक दुपारी चारच्या सुमारास निघेल. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेचे ढोल-लेझीम (मुलींचे) पथक, सनई वादन पथक यांचे खेळ होतील. ‘श्रीं’साठी आकर्षक फुलांचा रथ केला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील कुदळे यांनी दिली.

अमरदीप तरुण मंडळ (पिंपरी) - ‘श्रीं’च्या मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होऊन ढोल-ताशा वादन करतील. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केलेल्या रथातून सायंकाळी साडेसातच्या सुमारास ‘श्रीं’च्या मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे यांनी दिली. 

महापालिका, पोलिस यंत्रणा सज्ज

शहरात मंगळवारी (ता. ५) निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. २६ घाटांवर गणपती विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. आवश्‍यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. घाटांवर निर्माल्य कुंड तसेच, काही ठिकाणी विसर्जनासाठी हौदाची व्यवस्था आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात असेल. 

चिंचवड येथील चापेकर चौक आणि पिंपरी येथील कराची चौकात महापालिकेतर्फे स्वागतकक्ष उभारला आहे. मोशी-इंद्रायणी घाट येथेही स्वागतकक्ष असेल, अशी माहिती सह-आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. 
अनंत चतुर्दशीच्या दिवशी (ता. ५) विशेषतः पिंपरी आणि चिंचवड येथे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे पिंपरी आणि चिंचवड येथील विसर्जन मार्गावर पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कार्यरत असतील. विसर्जन घाटांवर नदीपात्राजवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक, सुरक्षारक्षक, अग्निशामक दलाचे वाहन आणि पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. विविध घाटांवर नदीपात्राजवळ बॅरिकेटस, सुरक्षा दोरी बांधली आहे. आरोग्य विभागातर्फे निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. पर्यावरण संवर्धन समितीचे स्वयंसेवक देखील निर्माल्य गोळा करण्याचे काम करणार आहेत. प्राधिकरण परिसरातील गणेश मूर्तींचे गणेश तलावात विसर्जन केले जाते. त्यासाठी तेथे चोख व्यवस्था केली आहे. 

आजचे वाहतूक नियोजन 
आकुर्डी येथील खंडोबा माळ ते चिंचवडगावला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद
पुणे- मुंबई महामार्ग चिंचवड येथील महावीर चौक ते लोकमान्य हॉस्पिटल रस्त्यावर वाहतूक बंद
चिंचवडगावातून लिंक रोडला जाणारी वाहतूक बंद
पिंपरीतील इंदिरा गांधी पूल मुख्य मिरवणुकीच्या वेळी बंद
पिंपरी चौकाकडे तसेच पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक भाटनगरमार्गे लिंकरोडने चिंचवडकडे
काळेवाडी पुलावरून येणाऱ्या वाहनांसाठी डीलक्‍स व कराची चौकात रस्ता बंद.
जमतानी चौक व गेलार्ड चौकातून जगताप डेअरीकडे वाहतूक