मुसळधार पावसाने शहराला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर परिसराला शुक्रवारी दुपारी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दुपारी दोनच्या सुमारास दाटून आलेल्या ढगांनी गडगडाटासह तुफान बरसात सुरू केली. शहरासह परिसरात अवघ्या काही मिनिटांत रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. अचानक सुरू झालेल्या या पावसाने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची दाणादाण उडवली. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक जोरदार पाऊस ठरला. 

काल रात्रीपासून पावसाच्या कमी-अधिक सरी अधूनमधून येत होत्या. मात्र, पहाटे पाऊस थांबला होता. सकाळी पडलेल्या उन्हामुळे पुन्हा वातावरण तापले आणि वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले. दुपारी दोनच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. जवळपास दीड तासाहून अधिक काळ पाऊस सुरू होता. पावसाला सुरवात होताच अवघ्या काही मिनिटांतच रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. 

उपनगरांतील सखल भागांत तळ्याचे स्वरूप आले. या पावसाने चाकरमान्यांची धांदल उडाली. बसथांब्याच्या आडोशाला प्रवाशांची एकच गर्दी केली. पायी जाणाऱ्या नागरिकांनी ऑटो रिक्षाचा आधार घेतला तर दुचाकीस्वारांनी भिजत जाणे पसंत केले. पावसाचा जोर वाढताच रस्त्यावरील चिंचवडच्या चापेकर चौकातील तसेच पिंपरीतील शगून चौकातील फळे, भाजी विक्रेते, पथारीवाल्यांनी गाशा गुंडाळला. पादचाऱ्यांची मात्र त्रेधा उडाली. चिंचवड स्टेशन व काळभोरनगरदरम्यान रस्त्यावर पाणी साचले. महापालिका भवनाजवळ मोरवाडी चौकातही थोडे पाणी साचल्याचे 
चित्र होते. 

पिंपरी-चिंचवडसह निगडी, आकुर्डी, चिखली, संभाजीनगर, भोसरी, इंद्रायणीनगर, कासारवाडी, सांगवी, दापोडी, पिंपळे सौदागर, वाकड आदी उपनगरांतही हा पाऊस झाला. मात्र, काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होता. देहूरोड, तळवडे, चिखली, मोशी भागात काल रात्री जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. मात्र शहरात पावसामुळे कुठेही अपघात किंवा अन्य दुर्घटना घडली नसल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.

Web Title: pimpri pune news heavy rain pimpri