नवीन चप्पल न आणल्याच्या वादातून कामगाराचा खून

रविंद्र जगधने
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पिंपरी - चिंचवडगावातून काळेवाडीकडे जाताना खुशबू हॉटेलच्या मागे 24 सप्टेंबरला राम सनेही जगदीश रावत या कामगाराचा खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. मयत राम याने आरोपीला नवीन चप्पल आणण्यास सांगितले होते. मात्र, चप्पल न आणल्याने झालेल्या वादातून आरोपीने रावत याच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

पिंपरी - चिंचवडगावातून काळेवाडीकडे जाताना खुशबू हॉटेलच्या मागे 24 सप्टेंबरला राम सनेही जगदीश रावत या कामगाराचा खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. मयत राम याने आरोपीला नवीन चप्पल आणण्यास सांगितले होते. मात्र, चप्पल न आणल्याने झालेल्या वादातून आरोपीने रावत याच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

राजदूत बार्सिंग राजपूत ऊर्फ दत्ता मच्छीवाला (वय 46, रा. मोहन, जालोन, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावत व राजपूत हे दोघे 15 ते 20 दिवसांपासून एकत्र राहत होते. नवीन चप्पल न आणल्याने त्यांच्यात घटनेच्या रात्री वाद सुरू झाला. त्यावेळी दोघेही दारू प्यायलेले होते. या वादातून राजपूत याने रावत याच्या डोक्‍यात दगड घालून खून केला. आणि तो पसार झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला.

मात्र, चेहरा विद्रूप झाला होता. पोलिसांना रावत याच्या खिशात आधारकार्ड मिळाले. त्यावरून पोलिसांनी त्याच्या गावी संपर्क करत पुण्यातील त्याच्या चुलत भावाला शोधले. पोलिसांनी याप्रकरणी दत्ता मासेवाल्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल केला. मात्र, पुन्हा पूर्ण माहिती नसल्याने त्याचा शोध लावणे कठीण होते. आरोपीच्या मागावर सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, पोलिस नाईक सुधाकर आवताडे, विजय आखाडे व स्वप्नील शेलार रवाना झाले. त्यांनी अगोदर मुंबईमधील आरोपीच्या नातेवाइकांचा शोध लावला.

त्यावेळी त्यांना आरोपी उत्तर प्रदेशमधील मूळ गावी गेल्याचे समजले. पोलिस पथक तत्काळ उत्तर प्रदेशमध्ये रवाना झाले. त्याठिकाणी आरोपी राजपूतला ताब्यात घेऊन चिंचवड पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.                                

ही कारवाई उत्तर प्रादेशिक पोलिस विभागाचे अपर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त राम मांडूरके, वरीष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश कांबळे, पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ सोडनवर, सुभाष डीगे, पोलिस नाईक स्वप्निल शेलार, सुधाकर आवताडे, विजयकुमार आखाडे, ऋषिकेश पाटील, महिला पोलि नाईक कांचन घवले, रूपाली पुरीगोसावी, पोलिस शिपाई चंद्रकांत गडदे, नितीन राठोड, राहुल मिसाळ, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, सचिन ढवळे यांनी केली.

Web Title: pimpri pune news murder case