सामान्यांच्या सुरक्षेसाठी गरज उपाययोजनांची

सामान्यांच्या सुरक्षेसाठी गरज उपाययोजनांची

पिंपरी-चिंचवडकरांची परिस्थिती इतकी बिघडत चालली आहे की, गुन्हेगारी रोखण्यासाठी एकटे पोलिस काहीही करू शकत नाही. गुन्हेगारीची ही कीड कायमची नष्ट झाली तर, किमान पुढची पिढी वाचेल. त्यासाठी समाजातील मान्यवरांनी पुढे आले पाहिजे.

खून, खंडणी, दहशतवाद हे पिंपरी-चिंचवडकरांच्या अगदी पाचविला पुजले आहे. गल्लीबोळात भाई, दादा सापडतात. हाणामारीशिवाय एक दिवस जात नाही. तलवारी, कोयते मिरवणाऱ्या टोळ्या झोपडपट्टीत दिसतात. गावठी कट्टे राजरोस विकणाऱ्या टोळ्याही आहेत. खंडणीसाठी जीव घेणारे सुपारी पंटर काही राजकारण्यांच्या दिमतीला आहेत. राजकारणी आणि गुन्हेगार यांचे नाते किती घट्ट आहे, याचे शेकडो दाखले देता येतील. पिढ्यान्‌पिढ्यांची मालमत्ता विकून मिळालेल्या पैशांवर काही मंडळी गब्बर झाली. त्यातूनच टिंगलटवाळी, छेडछाडी, टपोरीगिरी वाढली. प्रत्येक कॉलेजचा कोपरा टग्यांच्या ताब्यात असतो. निवडणूक आणि राजकारणाच्या उकिरड्याचे हे फलित आहे. घाम न गाळता, कुठलाही कामधंदा न करता केवळ भाईगिरीवर उदरनिर्वाह असणारी जमात येथे जगत आहे. त्याला खतपाणी घालणारे प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. अगदी हातात हात घालून हा धंदा चालतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तुझे माझे करताना वर्चस्ववाद पेटतो. त्यातून हल्ले प्रतिहल्ले होतात. रात्रीतून एखाद्याचा खेळ खतम होतो. दोन दिवस परिसरात दहशत असते. सोमवारी रात्री बारा वाजता आकुर्डी गावात असाच एका गुंडाचा खातमा झाला. पाच-दहा गुंडांच्या एका टोळक्‍याने वर्चस्व निर्माण करणाऱ्या दुसऱ्या गुंडाला संपवले. आकुर्डीकर दोन-चार महिन्यांतून एकदा असा अनुभव घेतात. पोलिसांचे सोपस्कार पार पडते. पण खून सत्र संपत नाही. या घटनांना सर्वांनी मिळून पूर्णविराम दिला पाहिजे. शहरातील गुन्हेगारी विश्‍व, टोळ्यांचे युद्ध हासुद्धा आता स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.

लोक जीव मुठीत घेऊन जगतात. राजकारणात यायला सज्जन लोक नकोच म्हणतात. कारण राजकारण हे गुंडांच्या कचाट्यात गुरफटलेले आहे. त्याचा बीमोड करणे पोलिस, जनता, कार्यकर्ते यांनी मनात आणले तर सहज शक्‍य आहे. ज्या दिवशी पोलिस आणि गुंड यांची मैत्री संपेल आणि जनतेला गृहखात्याबद्दल पूर्ण खात्री पटेल त्या दिवशी कदाचित हा अध्याय संपेल. प्रयत्न करा, जमेल. राष्ट्रवादीने केले नाही म्हणून ते गेले. आता भाजप ते करते की त्याच वाटेने जाते तेच पहायचे.

इतिहास काय सांगतो?
वीस वर्षांपूर्वी अपक्ष नगरसेवक संजय काळे याचा भर दिवसा गोळ्या घालून खून
पाठोपाठ एका नगरसेवकाच्या भावाला त्याच्याच गुंड साथीदारांनी यमसदनी पाठविले
किरकोळ गुन्ह्यांची संख्या मोजता येणार नाही इतकी आहे
निवडणूक लढविणाऱ्या आणि निवडून येणाऱ्यांवरसुद्धा खून, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत
काळभोर नामक गुंडाच्या दहशतीखाली आकुर्डी आहे
गुंड नगरसेवक अनिल हेगडे याचाही भर दिवसा खून झाला
नगरसेवक अविनाश टेकावडेचा त्याच्या सोसायटीत घुसून टपोरींनी भोसकून खून केला
जमीन खरेदी- विक्रीतून खून आणि खुनी हल्ले झालेल्यांची जंत्री मोठी
अजातशत्रू अशी ओळख असलेले भाजप शहराध्यक्ष ॲड. अंकुश लांडगे यांचा खून आजही आठवतो
ॲड. लांडगे प्रकरणातील गोट्या धावडे या गुन्हेगाराला गुंडांनीच संपविले
उद्योजक, बिल्डर, डॉक्‍टरांकडून करोडोंची खंडणी उकळणाऱ्यांनाच राजाश्रय मिळतो म्हणून गुन्हेगारी फोफावते आहे

हे करायला हवे...
सरकारने स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करावी
शहर आणि ग्रामीण पोलिस हद्दीचा वाद संपवला पाहिजे
दारू, मटका, जुगार अड्डे बंद करावेत
चौक, गल्ली, रस्ता, संकुले, पोलिस ठाणी, न्यायालय आवार, शाळा, महाविद्यालये, रेस्टॉरंट, सराफी पेढ्या आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावे
मुंबईप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांखाली आणल्यास गुंड प्रवृत्तीवर नजर राहील
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकारणाचा दरवाजा गुन्हेगारांना कायमचा बंद करावा- मतदारांनी रेकॉर्डवरच्या नमकहराम उमेदवारांना मत देणे थांबवावे
नागरिकांना सुरक्षित वाटावे यासाठी असे काही ठोस उपाय करावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com