विसर्ग वाढल्याने पवनेला पूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

शहरात संततधार सुरूच; मोरया गोसावी मंदिर आवारात पाणी

शहरात संततधार सुरूच; मोरया गोसावी मंदिर आवारात पाणी
पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरूच आहे. पवना धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. थेरगावचा केजुबाई बंधारा पाण्याखाली गेला असून, चिंचवडच्या श्री मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पाणी शिरले आहे. धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याने काल मध्यरात्री धरणाचे सहाही दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले असून त्यातून सुमारे सहा हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाची संततधार रात्रभर सुरू होती. त्यामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणातून 5961 क्‍युसेक विसर्ग सुरू केल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पाणी शिरले आहे. थेरगावचा केजूबाई बंधारा पाण्याखाली गेला आहे. रविवारच्या सुटीची पर्वणी साधत नागरिकांनी पूर बघण्यासाठी मंदिर परिसरात व बोट क्‍लब येथे गर्दी केली. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पावसाने पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात विशेषतः मावळ परिसरात दमदार हजेरी लावली आहे.

लोणावळ्यात गेल्या 48 तासांत 253 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पवना धरण पंधरा दिवसापूर्वी शंभर टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात शनिवारी 184 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस राहणार असल्याने पुराचा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. विसर्ग वाढविण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

पवना धरणाची स्थिती
पाण्याची पातळी - 613.26 मीटर
सध्याचा पाणीसाठा - 100 टक्के
24 तासांतील पाऊस - 184 मिलिमीटर
हायड्रोगेटद्वारे विसर्ग - 1301 क्‍युसेक
सहा दरवाजांमधून होणारा विसर्ग - 4570 क्‍युसेक
एकूण विसर्ग - 5961 क्‍युसेक