रेल्वे खोळंबली; प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पिंपरी - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे यंत्रणा ठप्प झाल्याने बुधवारी (ता. ३०) दिवसभर पुणे मुंबई रेल्वे वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू राहिली. त्यामुळे कन्याकुमारी-मुंबई एकस्प्रेस चिंचवड रेल्वे स्थानकामध्ये तब्बल साडेपाच तास रोखून धरण्यात आली. तर, विशाखापट्टणम-कुर्ला ही रेल्वेगाडीही दोन ते अडीच तास थांबविण्यात आली. परिणामी, दीड ते दोन हजार प्रवासी चिंचवड रेल्वे स्थानकात अडकून पडले. 

पिंपरी - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे यंत्रणा ठप्प झाल्याने बुधवारी (ता. ३०) दिवसभर पुणे मुंबई रेल्वे वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू राहिली. त्यामुळे कन्याकुमारी-मुंबई एकस्प्रेस चिंचवड रेल्वे स्थानकामध्ये तब्बल साडेपाच तास रोखून धरण्यात आली. तर, विशाखापट्टणम-कुर्ला ही रेल्वेगाडीही दोन ते अडीच तास थांबविण्यात आली. परिणामी, दीड ते दोन हजार प्रवासी चिंचवड रेल्वे स्थानकात अडकून पडले. 

मुंबई वगळता अन्य मार्गावरील वाहतूक सुरळित सुरू होती. मंगळवारी (ता. २९) मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. परिणामी, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर, पनवेलमार्गे जाणाऱ्या कोकण एक्‍सप्रेस सुरू ठेवण्यात आल्या. रात्रीनंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर बुधवारी सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, त्या नियोजित वेळेपेक्षा पाच ते सहा तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे कन्याकुमारी-पुणे गाडी सकाळी ९.५० पासून चिंचवड रेल्वे स्थानकामध्ये थांबविण्यात आली. मात्र, प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी चहानाश्‍त्याची सोय उपलब्ध करून दिली.

दरम्यान, विशाखापट्टणम-कुर्ला गाडीही ११.३४ वाजता स्थानकांत थांबविण्यात आली. मात्र, दोन ते अडीच तासांतच म्हणजेच दुपारी १.४३ वाजता तिला हिरवा सिग्नल मिळाला. तर, कन्याकुमारी-मुंबई रेल्वे साडेपाच तासांनंतर दुपारी ३.२२ वाजता मुंबईकडे रवाना झाली. 

स्थानक प्रबंधक भानुदास पाटील यांनी प्रवशांसाठी विशेष खानपान व्यवस्था केली होती. याबाबत पाटील यांनी कळविल्यावर स्थानिक नगरसेवक तुषार हिंगे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांसाठी स्थानकावर धाव घेत प्रवाशांसाठी पाणी व नाश्‍त्याची सोय केली. कन्याकुमारी-मुंबई एक्‍सप्रेसमध्ये सुमारे सोळाशे प्रवाशी अडकून पडल्याचे पाटील यांनी सांगितले.

भुसावळ गाडी वळवली
पुणे-भुसावळ ही रेल्वेही मळवली स्थानकापासून पुन्हा पुणे स्थानकाकडे वळविण्यात आली. तेथून ती दौंडमार्गे भुसावळकडे सोडण्यात आली.

बसगाड्यांचा पर्याय

लोणावळा - मुसळधार पावसाने मंगळवारी मुंबईला झोडपल्यानंतर थांबविण्यात आलेली द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी पूर्वपदावर आली. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे सेवा दुसऱ्या दिवशीही कोलमडली होती. परिणामी प्रवाशांनी पुन्हा रस्ते वाहतुकीचा पर्याय पत्करला. 

मुंबईत झालेल्या पावसाने संपूर्ण मुंबईत पाणी तुंबल्याने पोलिसांनी खबरदारी घेत द्रुतगतीवरील वाहतूक मंगळवारी सायंकाळी थांबवली होती. प्रामुख्याने उर्से, कुसगाव, सोमाटणे टोलनाक्‍यांवर वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मध्यरात्री दोननंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्यात आली. पावसाने बुधवारी थोडी उसंत घेतल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, लोणावळा येथे अडकून पडल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. चाकरमान्यांना सुटी जाहीर केली असली तरी इतर प्रवाशांचे मात्र हाल झाले. प्रवाशांनी पुन्हा रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारल्याने ओस असलेल्या बस स्थानकांवर गर्दी झाली होती. 

‘द्रुतगती’वर शुकशुकाट
सोमाटणे - पावसाने उघडीप दिल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी पहाटे साडेपाचपासून सुरू झाली. मात्र तुलनेने वाहनांची संख्या कमी होती.
मंगळवारी दिवसभर मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमधील वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास द्रुतगती मार्गावरील वाहतूक उर्से व खालापूर टोलनाका येथे, तर रात्री आठ वाजता पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक सोमाटणे व वलवण टोल नाका येथे थांबविली होती. त्यामुळे रात्रभर दोन्ही महामार्गांवर अनेक वाहने थांबलेली होती. मुंबईतील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आज पहाटे साडेपाचच्या सुमारास उर्से, खालापूर, सोमाटणे, वलवन येथे थांबविलेली वाहने सोडण्यात आली. मुंबईकडील मार्ग खुला झाला. तरीही कालच्या पावसाने धास्तावलेल्या अनेक नागरिकांनी आज प्रवास टाळला. तसेच राज्य परिवहन महामंडळानेही मुंबईकडे जाणाऱ्या अनेक बस रद्द केल्या होत्या. त्यामुळे दिवसभर रस्ता खुला असूनही वाहनांची फारसी वर्दळ नव्हती.  द्रुतगती मार्गावर आज दिवसभर नेहमीपेक्षा साठ टक्के वाहने कमी होती. उद्यापासून वाहतूक सुरळीत होण्याची शक्‍यता आहे.