पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे आज पहिले पाऊल

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे आज पहिले पाऊल

पिंपरी - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांमध्ये समाविष्ट झालेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील कामाचा प्रारंभ शनिवारी होत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागाचा सर्वांगीण विकास प्रथम करतानाच, शहरात सक्षम वाहतूक व्यवस्था, तसेच समाजोपयोगी सार्वजनिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी ११४९ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत.
 
बैठकीत २८ प्रस्ताव
स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या विशेष उद्देश वाहनच्या (एसपीव्ही) संचालक मंडळाची पहिली बैठक राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी- चिंचवड महापालिका भवनात शनिवारी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेही शहरातील विविध विकासकामाचा प्रारंभ शनिवारीच होत आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत २८ प्रस्ताव आहेत. त्यात तांत्रिक प्रस्तावांची संख्या जास्त आहे. पहिल्या बैठकीत त्याला मान्यता मिळाल्यानंतर, स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची आखणी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती या कामाला वेग येईल. 

वेगवेगळे निर्णय अपेक्षित
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘योजनेअंतर्गत करावयाची कामे निश्‍चित झाली आहेत. ती कशा प्रकारे करावयाची याबाबत सल्लागार कंपनीची नियुक्ती, एसपीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याबाबत बैठकीत चर्चा होईल. सल्लागार कंपनीने सर्वंकष प्रकल्प आराखडा दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. नगररचना, अभियांत्रिकी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातही निर्णय घेतले जातील.’’

प्रकल्प निधीची उभारणी
शहरात आरोग्यदायी वातावरण, लोकांचे जीवनमान सुधारणे, सक्षम सार्वजनिक वाहतूक, प्रदूषणावर नियंत्रण, लोकांना जलद माहिती देणे, अधिक पायाभूत सुविधा, नागरिकांचा सहभाग याकडे स्मार्ट सिटी उभारणीसाठी अधिक लक्ष दिले जाईल. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून अडीचशे कोटी रुपये मिळणार आहेत. महापालिकेने अडीचशे कोटी रुपये निधी द्यावयाचा आहे. 

शिवसेना न्यायालयात
भारतीय जनता पक्षाने ही योजना पूर्ण ताकदीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिवसेनेचे दोन्ही खासदार, तसेच भाजपचे खासदार यांनी योजनेतील प्रकल्पाची निवड करताना त्यांना विश्‍वासात घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. संचालक मंडळात शिवसेनेच्या प्रतिनिधींची निवड भाजपच्या स्थानिक नेत्यांनी परस्पर केल्याने, शिवसेनेचे शहरप्रमुख त्याविरोधात न्यायालयात गेले आहेत. 

काय आहे स्मार्ट सिटी
एरिया बेस डेव्हलपमेंट

पिंपळे सौदागर- पिंपळे गुरवची निवड
१३९० एकर जागा

सोसायट्या, वसाहती, हरितपट्टा अशा भागांचा समावेश    
५९३.६७ कोटी रुपयांचे प्रस्ताव

४५ ते ६० मीटर रुंदीच्या रस्त्यांचा विकास करणार
पादचारी, सायकलस्वार, स्मार्ट बससेवा व सिग्नल

रस्त्यांवर एलईडी व सोलर दिव्यांचा वापर
नदीकिनाऱ्यांचा विकास

कचरा जागीच जिरविण्याचा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग
उद्याने हरित पट्टा व पदपथाने जोडण्याचा प्रस्ताव

कासारवाडीत मेट्रो, लोकल रेल्वे, बीआरटी यांची माहिती देणारे ट्रान्झिट पॅकेज

प्रकल्पाची वाटचाल
ऑगस्ट २०१५ : स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या फेरीसाठी राज्य सरकारने पुण्याबरोबर पिंपरी -चिंचवडचे नाव सुचविले, पण केंद्राकडून केवळ पुणे शहराचा समावेश.
३० डिसेंबर २०१६ : स्मार्ट सिटी योजनेत नवी मुंबईऐवजी पिंपरी-चिंचवडचा समावेश.
फेब्रुवारी, मार्च २०१७ : महापालिका निवडणुकीनंतर या योजनेमध्ये लोकसहभागातून नागरिकांची मते, सूचना विचारात घेतल्या. तज्ज्ञांची मते जाणून घेतली.
३१ मार्च २०१७ : शहराचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राला सादर.
१९ मे २०१७ : विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) स्थापन करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची कार्योत्तर मान्यता.
जून २०१७ : महापालिकेच्या सभेत महापौरांसह सहा लोकप्रतिनिधींची एसपीव्हीच्या संचालकपदी निवड.
१३ जुलै २०१७ : एसपीव्हीची नोंदणी.
१२ ऑगस्ट २०१७ : एसपीव्हीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक.

पॅन सिटी प्रकल्प

संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश
५५५.५३ कोटी रुपयांचा प्रकल्प
सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
बसगाड्या, मेट्रोची येण्या-जाण्याची माहिती अगोदर देणारे फलक
महत्त्वाचे रस्ते जोडणार 
व्यवसाय, नोकरीसाठी एका ठिकाणी माहिती देणारे केंद्र
आठवड्यात एका ठिकाणी भाजीपाला व अन्य पदार्थ विक्रीसाठी केंद्रे
आयटी व अन्य माध्यमांतून लोकांना माहिती देणार
दळणवळणाची सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com