तंत्रज्ञानाचे विश्‍लेषणही आवश्‍यक - डॉ. कामत

तंत्रज्ञानाचे विश्‍लेषणही आवश्‍यक - डॉ. कामत

पिंपरी - ‘मोबाईलमुळे संपूर्ण जग आपल्या खिशात आले आहे. हे जग मुलांच्या खिशात कसे येईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तीन ते आठ वयोगटातील मुलांनाही हे ‘तंत्रज्ञान’ हाताळता आले पाहिजे. त्याबरोबरच तंत्रज्ञान कसे वापरायचे याचे शिक्षक व पालकांनाही शिक्षण देणे गरजेचे असून, केवळ माहिती घेण्यापुरताच या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ नये. तर त्याचे विश्‍लेषण करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र बालशिक्षण परिषद आणि छत्रपती शिवाजी प्रसारक मंडळाच्या वतीने नवी सांगवीतील संस्कृती लॉन्समध्ये आयोजित २४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्‌घाटक म्हणून त्या बोलत होत्या. परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी अध्यक्षस्थानी होत्या. स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, परिषदेच्या सचिव विशाखा देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. दिनेश नेहेते, नाझीर जमादार, नवी सांगवी परिषदेच्या अध्यक्षा मेघना बाकरे उपस्थित होते.
डॉ. कामत यांनी ‘तंत्रज्ञानाचा गरज आणि बालशिक्षणामधील त्याची उपयुक्तता’ याचा वेध घेतला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी तंत्रज्ञान, त्याचा अभ्यासक्रमातील समावेश, शिक्षकांचे शिक्षण, संशोधन, शिक्षक व्यवसाय विकास यावर प्रकाश टाकला.  

डॉ. कामत म्हणाल्या, ‘‘आज पूर्वप्राथमिक शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वीस कोटींच्या घरात आहे. तर, देशातील १३ लाख ५५ हजार अंगणवाड्यांमधून साडेचार कोटी बालके शिक्षण घेत आहेत. मात्र, उर्वरित बालकांचे काय, हा प्रश्‍न कायम आहे. ग्लोबल एज्युकेशन अहवालानुसार भारत शैक्षणिक क्षेत्रात तब्बल ५० वर्षे मागे आहे. त्यामुळे २०३० मध्ये गाठण्याजोगे उद्दिष्ट्ये २०८० मध्ये गाठणे शक्‍य आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षण संस्थांवर फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी कंबर कसून कामाला लागल्याशिवाय हे उद्दिष्टे गाठणे अशक्‍य आहे.’’ 

बियाणी म्हणाल्या, ‘‘तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आजची शिक्षणपद्धती बदलत आहे. शिक्षणात नवीन उद्दिष्टे येऊ लागली आहेत. मुलांनाही शिकणे सोपे जात आहे. अनेक शाळांमधून डिजिटल क्‍लासरूम तयार झाली आहेत. त्यामुळे विषयाचे आकलन लवकर होते. मात्र, तंत्रज्ञानाचा गैरवापर होणार नाही, याकडेही लक्ष देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मुलांशी प्रेमळ संवाद असला पाहिजे. मुलांमध्ये देशप्रेम, सामाजिकता, प्रेमभाव, आपुलकी, नम्रता रुजविण्यासाठी पालक, कुटुंब, समाज, शाळा, शिक्षकांनी एक सुंदर विश्‍व तयार करायला हवे. शिक्षणातही तरलता यायला हवी.’’ या वेळी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे डॉ. कामत यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

डॉ. कामत म्हणाल्या...
लहान मुलांना यशस्वितेचा आनंद द्यायला शिकले पाहिजे
शाळेत अध्ययनयोग्य वातावरण तयार करण्याची गरज
लहान मुले सर्वांगाने शिकतात
शास्त्रीय बालशिक्षणाची संकल्पना समजून घ्यावी
सहा वर्षांखालील मुलांना विचार करणे, कार्यकारण भाव समजून घेण्याची सवय लावणे आवश्‍यक
मुलांचे शालेय कौशल्य वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा विचार व्हावा
तंत्रज्ञान कसे, कुठे, केव्हा आणि कशासाठी वापरावे हे शिक्षकांनी समजून घ्यावे
२१ व्या शतकातील शिक्षक होण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्‍यकच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com