पाच प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणार

Platform
Platform

पुणे - लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या पुणे रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर उभ्या करून वेळेत बचत करण्यासाठी पाच प्लॅटफॉर्मची लांबी १०० ते १२५ मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यासाठीचा सुमारे ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे मंडळांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच याबाबतचे काम सुरू होईल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने स्पष्ट केले. 

विभागात सुरू असलेल्या कामांची माहिती पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सहव्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते. पुणे- लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम सुरू होण्यास विलंब लागणार असून, पुढील दोन महिन्यांत प्रकल्प अहवाल रेल्वे मंडळाकडे सादर करणार आहोत. या मार्गांवरील सुमारे १० हजार अतिक्रमणांचा मुद्दा गंभीर असून, त्यांना हटविण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येईल.

बारामती- फलटण लोहमार्गाचे काम वेगाने करण्यासाठी अजूनही सात गावांमध्ये मोजणी करायची आहे. पुणे ते दौंड स्थानकांदरम्यान ज्या- ज्या स्थानकांवर पादचारी पूल नाहीत, तेथे ते बांधले जातील. खुटबाव, कडेठाण येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, मांजरी बुद्रुकचा प्लॅटफॉर्म उंच होण्यास अजून पाच महिन्यांचा कालावधी लागेल. 

पुणे स्थानकावर येत्या ८-१५ दिवसांत प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशिन दाखल होणार असून, वॉटर व्हेंडिंगच्या संख्येत वाढ करण्याचा विचार आहे, असे देऊस्कर यांनी सांगितले.  

पुणे स्टेशनवर दररोज सुमारे २१० रेल्वेगाड्यांची वाहतूक होते, त्यातील १६० गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३, ४, ५ आणि ६ ची लांबी वाढविण्यात येईल, त्यामुळे २६ कोचच्या गाड्या उभ्या करता येतील. पुणे स्टेशनवरील सर्व पुलांना जोडण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे काम सध्या सुरू असून ऑगस्टअखेर तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. एकूण पाच ठिकाणी सरकते जिने बसविण्यात येतील. प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे वारंवार ब्लॉक घेण्यात येत असून, मध्यंतरी पुणे रेल्वे स्थानकावर पुलाच्या गर्डरच्या कामाकरिता ब्लॉक घेण्यात आला होता, असेही देऊस्कर यांनी नमूद केले.

सर्व पादचारी पुलांचे ऑडिट 
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ३४ पादचारी पूल, २२ रेल्वे ओव्हर ब्रिज असून, सुमारे एक हजार लहान- मोठे पूल आहेत. ते सर्व सुरक्षित आहेत. येत्या आठवड्यात या रेल्वे पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट पुन्हा एकदा करण्यात येईल. यापूर्वी झालेल्या पाहणीत कोणताही पूल असुरक्षित असल्याचे आढळले नव्हते, असेही व्यवस्थापक देऊस्कर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com