पुण्याचे आयुक्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांना जुमानेनात  

तुषार खरात 
मंगळवार, 16 मे 2017

परदेश दौऱ्यांची तर कुणाल कुमार यांना भारीच हौस आहे. गेल्या वर्षात त्यांनी सात वेळा परदेश दौरा केला आहे. वास्तविक पाच पेक्षा जास्त परदेश दौरे कोणत्याही अधिकाऱ्यांना करता येत नाहीत. त्यांच्या परदेश दौऱ्यांना नगरविकास विभागाने परवानगी नाकारली तरी ते दिल्लीतून वजन वापरून परवानगी मिळवितात

मुंबई : "पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार सध्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. नगरविकास विभागामध्ये कार्यरत असलेले प्रधान सचिव नितीन करीर आणि मनीषा म्हैसकर हे दोन्हीही अधिकारी कुणाल कुमार यांच्यावर कमालीचे नाराज असल्याची,'' माहिती सूत्रांनी `सरकारनामा'शी बोलताना दिली. 

म्हैसकर यांनी मंत्रालयात घेतलेल्या कोणत्याही बैठकीला कुणाल कुमार कधीही हजर राहात नाहीत. पुण्याच्या स्मार्ट सिटी योजनेचे अध्यक्ष नितीन करीर आहेत. या अनुषंगाने करीर यांनी बैठका घेतल्या तर त्या बैठकांमध्ये कुणाल कुमार विचित्र प्रस्ताव आणतात. त्यांच्या अशा प्रस्तावांवर करीर यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. किंबहुना प्रत्येक बैठकीत करीर हे कुणाल कुमार यांच्यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत असतात. परदेश दौऱ्यांची तर कुणाल कुमार यांना भारीच हौस आहे. गेल्या वर्षात त्यांनी सात वेळा परदेश दौरा केला आहे. वास्तविक पाच पेक्षा जास्त परदेश दौरे कोणत्याही अधिकाऱ्यांना करता येत नाहीत. त्यांच्या परदेश दौऱ्यांना नगरविकास विभागाने परवानगी नाकारली तरी ते दिल्लीतून वजन वापरून परवानगी मिळवितात. 

कुणाल कुमार यांच्या कामाविषयी मंत्रालयात कमालीची नाराजी आहे. पण दिल्लीत त्यांचे वजन असल्याने ते मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही वरचढ ठरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी, कुणाल कुमार यांनी राजकारण्यांविषयी शेरेबाजी केल्याने खासदार वंदना चव्हाण यांनी त्यांची तक्रारही केली होती. पण यानंतरही कुणाल कुमार यांच्या वागण्यात फार पडलेला नाही, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.